वाहतूक पोलिसांकडून वीज नियम धाब्यावर
By admin | Published: March 7, 2017 02:07 AM2017-03-07T02:07:53+5:302017-03-07T02:07:53+5:30
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच वीज कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत आहेत
नामदेव मोरे,
नवी मुंबई- कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच वीज कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत आहेत. तुर्भे वाहतूक पोलीस चौकीमध्ये चोरून विजेचा वापर सुरू आहे. शेजारच्या कंपनीकडून अनधिकृतपणे वीजजोडणी घेण्यात आली आहे. सामान्य नागरिकांवर तत्काळ गुन्हे दाखल करणारे महावितरण प्रशासन पोलिसांच्या चोरीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
गणपती व नवरात्री उत्सवामध्ये महावितरण प्रशासन सर्व मंडळांना तात्पुरता वीज मीटर घेणे बंधनकारक करते. ज्या मंडळांनी वीज मीटर घेतला नाही किंवा दुसऱ्या कोणाच्या मीटरमधून वीजजोडणी घेतली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. कारवाईसाठी दामिनी पथकाची निर्मिती करून धडक मोहीम राबविण्यात येत असते. याशिवाय वर्षभर कोठेही वीजचोरी किंवा विजेचा दुरुपयोग केल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतात. सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करणारे प्रशासन पोलिसांच्या वीजचोरीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शहरातील ८० टक्के पोलीस चौक्यांसाठी वीज मीटर घेण्यात आलेला नाही. काही ठिकाणी महापालिकेच्या पथदिवे व काही ठिकाणी शेजारी असणाऱ्या दुकानांमधून वीजजोडणी घेतली जात आहे. विशेष म्हणजे १५ ते २० वर्षांपासून उभारण्यात आलेल्या चौक्यांनाही अधिकृत जोडणी घेण्यात आलेली नाही. सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा पुलाखाली असलेल्या तुर्भे वाहतूक पोलीस मुख्य चौकीमध्येही अधिकृत वीजजोडणी घेण्यात आलेली नाही. शेजारील एका कंपनीकडून वीज घेण्यात आलेली आहे. नियमाप्रमाणे अशाप्रकारे वीज घेणे गुन्हा ठरत असल्याचे माहीत असूनही पोलिसांकडून जाणीवपूर्वक हा गुन्हा केला जात आहे.
तुर्भे वाहतूक पोलीस चौकी ही नवी मुंबईमधील सर्वात जुनी चौकी आहे. २० वर्षांपेक्षा जास्त काळ याठिकाणी चौकी सुरू आहे. पूर्वी परिमंडळ एकमधील वाहतूक नियंत्रणाचे काम याच चौकीच्या माध्यमातून केले जात होते. वाहतुकीचा व्याप वाढल्यामुळे आता प्रत्येक नोडमध्ये स्वतंत्र चौकी करण्यात आली आहे. दोन दशकांपासून या चौकीमध्ये वीज नियम धाब्यावर बसवून शेजाऱ्यांकडून वीज घेतली जात आहे. वीज कायदा २००३ च्या कलम १२६ प्रमाणे हा दखलपात्र गुन्हा ठरत असून या प्रकरणी विजेचा वापर करणारे व अनधिकृतपणे वीज देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. याशिवाय जेव्हापासून विजेचा दुरुपयोग केला तेव्हापासून दंड आकारणी करण्यात येते. यापूर्वी वाशी वाहतूक पोलीस चौकीला वीजपुरवठा करणाऱ्या जाहिरात कंपनीकडून दंडवसुली करण्यात आली होती. त्याही अगोदरपासून विजेचा दुरुपयोग सुरू असूनही तुर्भे पोलीस चौकीवर कारवाई करण्यात होत नसल्याने वितरणच्या संगनमतानेच विजेचा दुरुपयोग सुरू असल्याची शक्यता आहे.
>कलम १२५ व १२६ चे उल्लंघन
पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १२५ व १२६ चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. कलम १२५ प्रमाणे चोरून वीजजोडणी घेतली व १२६ प्रमाणे शेजाऱ्यांकडून अनधिकृतपणे वीजजोडणी घेतली असून या दोन्ही कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनेवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. महावितरणचे अधिकारी कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
>नाक्यावरही वीजचोरी
तुर्भे वाहतूक पोलिसांच्या मुख्य चौकीमध्ये विजेचा दुरुपयोग करण्यात आला आहेच, शिवाय तुर्भे नाक्यावर सुरू केलेल्या स्वतंत्र बीट चौकीसाठीही चोरून वीजजोडणी घेण्यात आली आहे. या चौकीमध्ये पोलीस नसले तरी विजेची उपकरणे सुरूच ठेवली जात आहेत. नाक्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहेत व त्यांच्या वीजचोरीकडे महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत आहे.