अवकाळी पावसाने आशेवर पाणी
By admin | Published: March 17, 2017 01:06 AM2017-03-17T01:06:09+5:302017-03-17T01:06:09+5:30
पोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले
लातूर/उस्मानाबाद/बीड : पोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. या पावसात बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा, द्राक्षांच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम गुरुवारी सुरू झाले.
लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर तालुक्यात ३ हजार ६०० हेक्टर, तर औसा तालुक्यात १९ हजार ८४० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. लातूर तालुक्यात उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड तसेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकाने नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांची समिती गठित केली आहे. आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या समित्यांना दिले आहेत.
शेत, गाव आणि पीकनिहाय याद्या तयार करून पंचनामे केले जाणार आहेत. गावचा ग्रामसेवक तसेच तलाठी, मंडळ अधिकारी आणि शेतकरी पंचनाम्यादरम्यान उपस्थित राहतील आणि पंचनाम्याचा अहवाल तहसीलदारांकडे प्रारंभी सादर होईल. तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. तसे आदेश या समित्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी पिकांसह फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ६ हजार ५७२ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे ३ हजार ६२५ हेक्टरवरील ज्वारी आडवी झाली आहे. तसेच काढणीला आलेल्या गव्हाची लोळवण झाली आहे. दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यात द्राक्ष बागांचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक प्रमाण असून, जवळपास सोळा हेक्टवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे आंबा चोवीस, कांदा बारा, टरबूज-खरबूज तीस आणि २१ हेक्टवरील भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बीड जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा तब्बल १२ हजार हेक्टरवरील पिकांना बसला आहे. बुधवारी जिल्ह्यात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यात १०.४५, पाटोदा १०.००, अंबाजोगाई २.२०, माजलगाव १.५०, केज १५.७१, धारूर १०.६७, परळी १०.०० अशी नोंद आहे. मंडळानुसार पावसामध्ये तफावत असली तरी वादळी वाऱ्याने ज्वारीची पडझड झाली आहे. फळबागांमध्ये आंबा व द्राक्षांच्या बागा कोलमडल्या आहेत. धारूर तालुक्यातील २८ गावशिवारातील १३४० हेक्टर, केज तालुक्यातील ३५०० हेक्टर, परळी तालुक्यातील ५००० हेक्टर असे जिल्हाभरातील जवळपास १५ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. परळी तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी जिल्हाधिकारी राम यांनी गुरुवारी केली.