पावसामुळे रस्त्यांचे पितळ उघडे
By admin | Published: September 19, 2016 01:26 AM2016-09-19T01:26:35+5:302016-09-19T01:26:35+5:30
गणपती विसर्जनाच्या दिवशी भोसरीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
पिंपरी : गणपती विसर्जनाच्या दिवशी भोसरीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पण गेले तीन दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे महापालिकेच्या रस्त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. कारण गणेशोत्सवापूर्वी भरण्यात आलेले खड्डे पूर्ववत उघडे पडले असून, येथील पिंपरी, नाशिक महामार्ग, तसेच इतर अंतर्गत रस्त्यांवर ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ अशी अवस्था झालेली दिसून येते आहे. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचत असून, अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. हे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दर वर्षी पावसाळ्यात नेहमीच्या ठिकाणीच खड्डे होतात. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचा घाट घातला जातो, तो केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठीच. कारण रस्त्यांची ही मलमपट्टी जास्त दिवस टिकत नाही. तसेच खड्ड्यातील वाळू इतरत्र पसरून दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाल्याच्या कित्येक घटना या भागात घडल्या आहेत. डांबरीकरणाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांचे समाधान करण्याचा निष्फळ प्रयत्न दर वर्षी केला जातो. पण नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही. मुख्य रस्त्यांची ही अवस्था असेल, तर अंतर्गत रस्त्यांचे काय?
पिंपरी एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची तर दैना झाली आहे. या रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे वाहनचालकांची डोकेदुखी
ठरत आहेत, तर रात्री-अपरात्री
खड्डे न दिसल्याने बरेच अपघात होत आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी
साचत असल्यामुळे त्यातून एखादे वाहन गेले, तर या खड्ड्यांतील पाणी बाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडते.
औद्योगिक क्षेत्रात देश-परदेशातील उद्योजक भेट देतात. त्यांनाही रस्त्याच्या दुरवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. लवकरात
लवकर हे खड्डे बुजवावेत, तसेच हे खड्डे बुजवण्यासाठी चांगल्या
दर्जाचे डांबर वापरावे, अशी
मागणी वाहनचालक, नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)