लाल कांद्यामुळे शेतकरी बनले लखपती !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 11:57 AM2018-04-02T11:57:33+5:302018-04-02T11:57:33+5:30
आॅगस्टनंतर बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला यंदा सलग पाच महिने क्विंटलमागे अडीच हजारांपेक्षा अधिक दर मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी लखपती होण्याची किमया झाली आहे.
- योगेश बिडवई
मुंबई : आॅगस्टनंतर बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला यंदा सलग पाच महिने क्विंटलमागे अडीच हजारांपेक्षा अधिक दर मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी लखपती होण्याची किमया झाली आहे. लासलगाव परिसरात कांद्याच्या पैशांतून किमान ५०० नवे ट्रॅक्टर शेतक-यांच्या दारात उभे राहिले आहेत.
१०० वर्षांत पहिल्यांदा दुष्काळी तालुके असलेल्या चांदवड, येवला, नांदगाव व इतर परिसरात कांदा उत्पादकांना घामाचा दाम मिळाला आहे. एकरी ७० हजार खर्च केल्यानंतर दोन एकरातील पिकामुळे शेतक-यांना सुमारे पाच लाख रुपये मिळाले. कोणाकडे ट्रॅक्टर आला, कोणी मालवाहू जीप - मोटारसायकल घेतली, कोणी घराचे काम सुरू केल्याचे चित्र या भागात आहे.
प्रल्हाद त्र्यंबक कदम (कातरणी, येवला) यांनी यंदा ९ एकर क्षेत्रात लाल कांद्याची लागवड केली होती. सप्टेंबरच्या जोरदार पावसात पाच एकरातील पीक खराब झाले. मात्र ऐन दिवाळीपूर्वी पुन्हा पाऊस झाल्याने पुढचा कांदा तगला. त्यांना ६०० क्विंटल उत्पादन झाले आणि क्विंटलला सरासरी २,६०० रुपये भाव मिळाल्याने हाती १५ लाख आले. खर्च वगळून त्यांना आठ लाखांचा नफा झाला. गेल्यावर्षी पैसे नसल्याने सव्वा लाखाचा प्लास्टिक कागद शेततळ्यात टाकता आला नव्हता. आता मात्र ही चिंता मिटली आहे.
>टेम्पोचालक न्याहारकर झाले लखपती
वाहेगाव साळचे निवृत्त न्याहारकर हे शेतीबरोबरच छोटा टेम्पो चालवितात. कांद्याचे बारदान घेऊन ते मनमाड, सटाणा, देवळा, नामपूर, चाकण, नांदगाव येथे जातात. त्यांनाही यंदा एक एकरमध्ये खर्च वजा जाता १ लाख ६० हजार रुपये झाले. नवरा, बायको, आई आणि त्यांची दोन मुले सगळेच शेतात राबतात. घरची मेहनत असल्याने मजुरांचे पैसे वाचतात. कांद्याच्या चार महिन्यांत सकाळी चहा घेतला की म्हाता-या माणसापासून लहान पोरापर्यंत सारं घर शेतात असतं. माझी आई लंकाबाई, नव्वदाव्या वर्षीही शेतातल्या कामात मदत करते, त्याबिगर तिला चैन पडत नाही.
थंडी, गारठा, अंधारात रात्री पाणी भरावंच लागतं. दोन वर्ष चाळीतच कांदा सडला. गेल्या वर्षी कांदाच केला नव्हता.
- प्रल्हाद कदम, कातरणी, येवला
कातरणीतील अजित किसन कदम यांनी कांद्याच्या पैशांतून नवा कोरा ट्रॅक्टर घेतला आहे. ५० हजार रुपये अनुदान आणि आणखी पैसे टाकून त्यांनी शेततळे केले. १२ एकरमध्ये ९०० क्विंटल पीक आले. तीन एकरातील कांदा खराब झाला. उतारा नीट मिळाला नाही. मात्र सरासरी अडीच हजार भाव मिळाल्याने तीन पिढ्यांमध्ये झाले नाहीत, असे पैसे कदम कुटुंबीयांना मिळाले.
>दूध घालणारे शेतकरी १० लाखांचे धनी!
चांदवड तालुक्यातील पाटे येथील सत्तर वर्षीय शेतकरी काशिनाथ राघो ठोके हे लासलगावला दूध घालतात. त्यांना पाच एकरमध्ये कांद्याचे १० लाख रुपये झाले. त्यांनी सहा लाख रुपये खर्च करून शेततळे केले आहे. त्यांच्याकडे तीन म्हशी, एक गाय आहे. माझी आई १०० वर्षांची आहे. तिलाही कांद्याचे एवढे चांगले पैसे झाल्याचे आठवत नाही, असे ठोके यांनी सांगितले.
>केंद्र सरकारचा हस्तक्षेपच नडतो
सरकारने यंदा कांद्याच्या बाजारपेठेत हस्तक्षेप न केल्याने व निर्यातीवर बंधने न आणल्याने चांगला भाव मिळाला, असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
>शेतकरी बँकेतील ठेवी २०० कोटींवर
लोकनेते दत्ताजी पाटील बँकेच्या लासलगाव शाखेत १३६ कोटींवर असलेल्या ठेवी जानेवारी अखेर १९६ कोटींवर गेल्या. शेतकºयांनी गहाण ठेवलेले ५ कोटींचे सोने सोडविले आहे.
>२७०० कोटींची उलाढाल
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे व सोलापूर या चार बाजार समित्यांची एप्रिल १७ ते जानेवारी १८ या कालावधीत २,७५७ कोटी ९१ लाख ८८ हजार १२० रुपये उलाढाल झाली.
>एक कोटींचे उत्पन्न
येवला तालुक्यातील धामणगाव येथील महेश जेजुरकर यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांचे दोन काका निवृत्त अधिकारी आहेत. घरात शेतकरी संघटनेचा वारसा आहे. जेजुरकर कुटुंबाने १०० एकर कांदा केला. त्याचे त्यांना एक कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
>दुष्काळी चांदवड तालुकाही सुखावला
सतत दुष्काळ असणा-या चांदवड तालुक्यात कोणाला लाल कांद्याचे १० लाख, कोणाला २० लाख रुपये झाले आहेत. सोनीसांगवी, दहिवद, दिघवद, जोपूळ, भोयेगाव, हिवरखेडे, तळेगाव येथे कांद्याला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. साडेपाच हजार लोकसंख्येच्या तळेगावात दिवसाला चार-पाच नवे ट्रॅक्टर येतात. गावात ५० ट्रॅक्टर आले आहेत. काहींनी पीक-अप वाहने घेतली.