निकृष्ट कामामुळे गटारावरील स्लॅब तुटला
By Admin | Published: May 19, 2016 03:05 AM2016-05-19T03:05:48+5:302016-05-19T03:05:48+5:30
नेरूळ सेक्टर १० मधील तेरणा शाळेसमोर ठेकेदाराने गटाराचे काम निकृष्ट केले असल्याचे निदर्शनास आले
आहे. पीक अप व्हॅनच्या वजनाने गटारावरील स्लॅब तुटल्याची घटना नुकतीच घडली आहे. या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याविषयी चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नेरूळ सेक्टर १० मधील सारसोळे बस डेपो ते गावदेवी मंदिरापर्यंतच्या पावसाळी गटाराचे बांधकाम महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी केले आहे. ठेकेदाराने जुने गटार तोडून पूर्णपणे नवीन बांधणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात जुने बांधकाम पूर्णपणे काढले नाही. ठेकेदाराने नियम व अटींप्रमाणे काम केले नाही. गटारावरील स्लॅबही निकृष्ट दर्जाचा केला आहे. महापालिकेच्या अभियंत्यांनी कधीच या कामाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. काम पूर्ण होऊन जवळपास सहा महिने झाले आहेत. या गटारावरून पीक अप व्हॅन तेरणा शाळेमध्ये साहित्य घेऊन जात होती. गटारावरील स्लॅब कोसळल्याने गाडीची चाके गटारात गेली. सुदैवाने यामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. पीक अप व्हॅनचे वजनही स्लॅबला पेलवले नाही. तेरणा शाळा व वैद्यकीय महाविद्यालयासमोर हे गटार आहे. येथे नियमितपणे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. भविष्यात गटाराचा स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिका प्रशासनाने या गटाराच्या कामाची चौकशी करावी. ठेकेदाराने नियमाप्रमाणे काम केले आहे का, कार्यादेश देताना व निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे काम केले आहे का हे पाहावे व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी विविध करांच्या रूपाने दिलेल्या पैशाची ठेकेदारांवर होणारी उधळपट्टी थांबवावी व निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करणार आहेत.