अवकाळी पावसाने राज्यभरात तापमानात कमालीची घट
By admin | Published: March 2, 2015 02:16 AM2015-03-02T02:16:31+5:302015-03-02T02:16:31+5:30
राज्यासह मुंबईत शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट नोंदवली आहे.
मुंबई : राज्यासह मुंबईत शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट नोंदवली आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे १२.२ अंश सेल्सिअस एवढे, तर मुंबईचे किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. तर पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तर भारतात निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपामुळे (वेस्टर्न डिस्टबर्न्स) राज्यासह मुंबईला शनिवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. शिवाय कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यासह विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले. शनिवारी मुंबईवर पाऊस घेऊन आलेल्या ढगांचे प्रमाण रविवारी मात्र कमी झाले होते. परिणामी, रविवारी मुंबईत कडाक्याचे ऊन पडले होते. शनिवारी झालेल्या पावसामुळे रात्रीच्या हवेत आलेला गारवा रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत कायम होता. मात्र नंतर पडलेल्या उन्हाने मुंबईकरांना पुन्हा चटके दिले. तर सूर्यास्ताच्या वेळी शहराच्या पश्चिमेला पुन्हा एकदा काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाल्याचे चित्र होते.
आंब्यासह वीटभट्ट्यांचे नुकसान
गेले दोन दिवस रायगडसह परिसरात पडलेल्या पावसाने शेतीसह, मासेमारी व वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान केले. ऐन मोसमातच या पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर खालापूर तालुक्यातील वीटभट्टीलाही फटका बसला आहे.
ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी
ठाणे जिल्ह्यात शनिवारपाठोपाठ रविवारीही अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पाहण्यास मिळाल्या. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. शहरात मागील २४ तास ७.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)