पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप

By admin | Published: August 23, 2016 02:35 AM2016-08-23T02:35:42+5:302016-08-23T02:35:42+5:30

महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Due to the scarcity of water, people become resentful | पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप

पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप

Next


नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरवासीयांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरूळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने १३६ कुटुंबीयांची गैरसोय होत असून हा प्रश्न तत्काळ मिटला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चोवीस तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिका असा नवी मुंबईचा देशभर लौकिक आहे. यासाठी पालिकेने केंद्र शासनाचे पुरस्कारही मिळविले आहेत. मालकीचे धरण असल्याने पुढील ५० वर्षे पाणी टंचाई भासणार नाही असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पावसाळ्यातही पिण्यापुरते पाणी उपलब्ध होत नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिमाणसी १३५ लिटरप्रमाणे पाणी पुरविण्याची योजना आखली असून त्याची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली आहे.
प्रत्येक सोसायटीमध्ये एकूण सदनिका व प्रत्येक सदनिकेमध्ये ५ व्यक्ती गृहीत धरून पाणी सोडले जात आहे. परंतु अनेक सोसायट्यांमध्ये सरासरी १३५ प्रमाणेही पाणी मिळत नाही. याशिवाय सोसायटीच्या टेरेसवरील टाकीतून पाणी सोडले की तळमजल्यावरील नागरिकांना जास्त पाणी मिळते. त्या तुलनेमध्ये वरच्या मजल्यावर राहणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. या वस्तुस्थितीकडे व तांत्रिक अडचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेरूळमधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये १३६ सदनिका आहेत. पालिकेच्या सुधारित नियमाप्रमाणे सोसायटीला रोज ९१८०० लिटर पाणी मिळाले पाहिजे. परंतु १ ते १५ आॅगस्ट पर्यंत १३८० युनिट पाणी मिळणे आवश्यक असताना फक्त ८४८ युनिट पाणी मिळाले आहे. ५३२ युनिट पाणी कमी मिळाले आहे.
एव्हरग्रीन सोसायटीमधील पदाधिकारी महादेव पवार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की उन्हाळ्यामध्ये धरणात पाणी नसल्याचे कारण देवून पाणी कपात करण्यात आली. परंतु पावसाळ्यात धरणातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली असतानाही नागरिकांना गरजेपुरतेही पाणी मिळत नाही. प्रशासनाने कागदावर केलेले नियोजन बरोबर असले तरी त्यांनी एकदा प्रत्यक्ष नागरिकांशी बोलून वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे.
स्थानिक नगरसेविका सुजाता सूरज पाटील यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
>महासभेत उमटणार पडसाद
युवक राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली आहे. प्रशासन नागरिकांची अडवणूक करत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले जाणार आहे. एव्हरग्रीनमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी नियमित पाठपुरावा केला असून या समस्येचे पडसाद आता सर्वसाधारण उमटणार असून यानंतरही मार्ग निघाला नाही तर नागरिक हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

Web Title: Due to the scarcity of water, people become resentful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.