बंदमुळे मोशी मंडईमध्ये शुकशुकाट
By admin | Published: July 21, 2016 02:06 AM2016-07-21T02:06:39+5:302016-07-21T02:06:39+5:30
नागेश्वरमहाराज भाजी मंडईतील विक्रेत्यांनी शासनाने घेतलेल्या आडत खरेदीदारांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात संप केला.
मोशी : येथील नागेश्वरमहाराज भाजी मंडईतील विक्रेत्यांनी शासनाने घेतलेल्या आडत खरेदीदारांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात संप केला. मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या मोशी भागात नागेश्वर भाजी मंडई हे एकमेव भाजी खरेदी करण्याचे येथील नागरिकांना सोयीचे ठिकाण आहे.
येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी मोशीतील विविध भागांतील रहिवाशी, नागरिक येत असतात. आज मंडई बंद असल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यांना भाजीसाठी इतर ठिकाणांचा आधार घ्यावा लागला. काही गृहिणींना घरातील कडधान्यावरच आजचा दिवस भागवावा लागला. मध्यमवर्गीय कुटुंबीयांची ही मंडई हक्काची खरेदीची जागा आहे. ती बंद असल्याने त्यांचे दिवसभराचे नियोजन काहीसे कोलमडले.
या निर्णयामुळे सध्या सर्वच ठिकाणी संप, निषेध होत असून, यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. यावर शासनाने योग्य तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
मोशी मुख्य चौकातील नागेश्वरमहाराज भाजी मंडईतील किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने मंगळवारी दिवसभर बंद ठेवत संप करत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.
हा निर्णय शेतकरी हिताचा नसून, त्यात व्यापारी व शेतकरी दोघेही भरडले जाणार आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांना याचा फटका बसणार असून, त्यांना अधिकची आडत देणे अवघड व अशक्य जाणार आहे. याचा ग्राहकांवरही बोजा पडणार असून, अगोदरच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांवर हा अधिकचा बोजा पडल्यास ते थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करू लागतील. यामुळे आमच्या व्यवसायावर गदा येणार आहे. आमची घरे चालणार कशी, आमच्या उत्पन्नाचे साधनच हिरावले जाईल. निर्णय शेतकरी हिताचा असला, तरी त्यात काही तरतुदी या अन्यायकारक आहेत. यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मंडईतील विक्रेते करत आहेत. तसेच शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये फेरीवाल्यांना फिरकू दिले जात नव्हते. परंतु आता त्यांना प्रवेश दिला जात आहे. (वार्ताहर)
>सलग चौथ्या दिवशीही भाजी मंडईमध्ये शुकशुकाट
भाजीविक्रेत्यांनी बंद पाळल्याने चौथ्या दिवशीही च्ािंचवड, आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये आजही शुकशुकाट दिसून आला. अनेक गृहिणी भाजीपाला घेण्याच्या अपेक्षेने येत होत्या. मात्र, मंडई बंद असल्याचे पाहून निराश आणि संतप्त मनाने त्या माघारी फिरत होत्या. बेमुदत बंद असल्याने कधीपर्यंत मंडई सुरू होतील, हे सांगता येणार नाही, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. एक-दोन ठिकाणीच हातगाडीवरून भाजी विकत असल्याचे दिसले. त्यांच्याकडून सर्वच प्रकारच्या भाज्यांसाठी अव्वाच्या सव्वा किमती आकारल्या जात होत्या.
>ग्राहकांमधून व्यक्त होतोय संताप
भोसरी : एरवी नेहमी वर्दळ दिसून येणाऱ्या पिंपरी, आकुर्डी, चिंचवड आणि भोसरी येथील मंडईमध्ये गेल्या चार दिवसांपासून शुकशुकाट आहे. रस्त्यांवर, सोसायट्यांमध्ये आणि गल्लोगल्ली हातगाडी आणि टेम्पोतून भाजी विकण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मंडईला पर्याय म्हणून टेम्पो, हातगाडीवर भाजी मिळत असली, तरी ती चढ्या भावाने दिली जात असल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. मंडईत दहा रुपयांना मिळणारी मेथीची गड्डी २० रुपयाला विक्री होत आहे. दुप्पट, तिप्पट दराने भाजी विक्री होत आहे. गरज म्हणून ग्राहकांना जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे. संत तुकारामनगर येथील मोठ्या गृहप्रकल्पाच्या बाहेर गेल्या दोन दिवसांपासून भाजी विक्रेते टेम्पो घेऊन थांबू लागले आहेत. त्या ठिकाणी आता मंडईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आठवडा बाजाराच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात एक दिवसासाठी भाजी विक्रेते येत असत. आंदोलनकर्त्यांनी इतरांनाही भाजी विक्रीस विरोध केल्याने आठवडा बाजारही भरत नाहीत.
(प्रतिनिधी)