विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी वृद्ध महिलेसह नातलगांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 10:19 PM2019-01-18T22:19:31+5:302019-01-18T22:19:54+5:30
वीमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी महिलेस दोन दिवस रुग्णालयातच अडकून पडावे लागल्याचा संतापजनक प्रकार मीरारोड येथे घडला आहे
मीरारोड - ८५ वर्षाच्या वृध्द महिलेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर बुधवारी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला होता. पण वीमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे त्या महिलेस दोन दिवस रुग्णालयातच अडकून पडावे लागल्याचा संतापजनक प्रकार मीरारोड येथे घडला आहे.
लक्ष्मी श्रीधर दरेकर यांना पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरेकर यांचे पती युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीतच कामाला होते व कंपनीच्या कर्मचारयांसाठी असलेला वैद्यकिय वीमा त्यांचा होता. रुग्णालयात दाखल केले त्या नंतर उपचरासाठीच्या साडेतीन लाख रु पयां पर्यंतच्या वीमा रकमेस तत्वत: मंजुरी कंपनीने दिली होती.
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर दरेकर यांना बुधवारी सायंकाळी रुग्णालयाने डिस्चार्ज दिला. रुग्णालयाचे बील सुमारे ६ लाख इतके झाले होते. रुग्णालयाने वीमा कंपनीकडे देयकाच्या मंजुरीचा प्रस्ताव पाठवला असता तो मंजुर होऊन आला नाही. म्हणुन बुधवारची रात्र दरेकर यांनी रुग्णालयात काढली.
परंतु दुस-या दिवशी गुरुवारी देखील कंपनी कडुन प्रस्ताव मंजुर होऊन आला नाही. दरेकर यांच्या नातलगांनी वीमा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रासह कंपनीच्या कार्यालयांशी सतत संपर्क केले. परंतु तांत्रिक अडचण आहे, आमचे डॉक्टर येऊन पाहणी करतील, आत्ता तासाभरात मंजुरीचा निरोप रुग्णालयात पाठवू, अशी उडवाउडवीची कारणं कंपनी कडुन सांगितली जाऊ लागली.
गुरुवारची रात्र सुध्दा रुग्णालयातच काढल्या नंतर दरेकर यांच्या वीमा मंजुरीचा प्रस्ताव शुक्रवारी सायंकाळी मंजुर होऊन रुग्णालयास पाठवण्यात आल्या . त्या नंतर दरेकर यांना नातलगांनी रुग्णालयातुन घरी नेले. वीमा कंपनीच्या भोंगळ कारभारा मुळे वृध्द रुग्ण महिलेस बुधवारी डिस्चार्ज मिळुन देखील शुक्रवारी सायंकाळ पर्यंत घरी जाता आले नाही. रुग्णालयातच अडकून पडावे लागल्याने रुग्णा सह नालतगांना खूपच मन:ताप सहन करावा लागला. दरेकर यांचे मानसिक संतुलन बिघडू लागले. युनायटेड इंडिया इन्शुरन्स ही कंपनी अन्य एका कंपनीत विलीन झाल्यामुळे दरेकर सह अन्य अनेक रुग्णांना अशा दिरंगाईचा फटका बसत असल्याची चर्चा आहे.
डिस्चार्ज नंतर दरेकर यांना घरी घेऊन जाण्याचा पर्याय कुटुंबियांना दिला होता. पण वीमा मंजुर होईल अशी त्यांना खात्री असल्याने ते रुग्णालयातच थांबले. परंतु आम्ही त्यांच्याकडून नंतरच्या दोन दिवसाचे शुल्क घेतलेले नाही. यात वीमा कंपनीची चुकी आहे .
- मनीष शर्मा ( रु ग्णालयाचे पदाधिकारी )
वीमा कंपनीच्या भोंगळपणामुळे खुपच मन:स्ताप सोसावा लागला. कंपनी कडून नेमके उत्तरच मिळत नव्हते. माझ्या आजीस नाहक रुग्णालयात अडकून पडावे लागले.
- अमिता दरेकर ( रुग्णाची नातलग )