त्वचा, श्वसनाच्या विकारांनी मुंबईला ग्रासले, वाढत्या प्रदूषणाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 07:22 AM2017-12-02T07:22:37+5:302017-12-02T07:22:41+5:30
मुंबईमध्ये सध्याच्या वातावरणातील पारा विस्कळीत झाला असून, दुपारी ऊन व रात्री बोचरी थंडी मुंबईकरांना झोंबत आहे. यामागची कारणे म्हणजे, मुंबईमध्ये सततची सुरू असलेली वाहतूक, बांधकामे, भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या कारणाने केले जाणारे खोदकाम, झाडांची कत्तल, सफाईअभावी वाढणारी धूळ, डम्पिंग ग्राउंड व अन्य ठिकाणी लागलेल्या आगीमुळे होणारे वायुप्रदूषण हे होय. हिवाळ्यात तापमान कमी होते. त्यांचा परिणाम शरीरातील रक्तदाबावर होतो.
कुलदीप घायवट
मुंबई : दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून, त्याचे दुष्परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. झाडांची होत असलेली कत्तल प्रदूषणाच्या वाढीस कारणीभूत ठरत असून, प्रश्न अधिकच बिकट होत आहे. त्यात जागतिक तापमानात होणारी वाढ, वातावरणातील धूलिकणाची वाढती मात्रा, यामुळे मुंबईची अवस्थाही प्रदूषणाबाबत ‘दिल्ली’सारखी होईल, अशी भीती पर्यावरणतज्ज्ञांसह आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
अशाच काहीशा प्रदूषणयुक्त वातावरणात आता हिवाळ्यातील कमी तापमान व वातावरणातील थंडाव्यामुळे धूलिकणांचा थर साचून धुरके तयार होते आणि आणि हेच धुरके आजारांना आमंत्रण देत असून, येथे श्वसन, त्वचेच्या विकारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्वचेच्या विकाराने आणि श्वसनाच्या विकाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, दिवसाला एका रुग्णालयात किमान १५ ते २० रुग्ण उपचारासाठी येतात. हाच आकडा आठवड्याला एका रुग्णालयाचा ६० ते ७० रुग्णांच्या आसपास जातो, अशी माहिती त्वचारोगतज्ज्ञ स्नेहल हडवले आणि श्वसनविकारतज्ज्ञ मनोज मस्के यांनी दिली.
मुंबईतील हवामानात होणाºया सततच्या बदलामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. श्वसनाचे आजार व त्वचा विकारांचे प्रमाण वाढत असून, श्वसन आजारात दमा, क्षयरोग, न्यूमोनिया, फुप्फुसाचा कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे, अशा आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्वचा विकारात त्वचेच्या एलर्जीचे प्रमाण वाढले असून, त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे, फोड येणे असे विकार होत आहेत, तसेच हृदयविकार, रक्तदाब, मेंदूची कार्यप्रणाली मंदावणे, अशा गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. अशा विकारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचेही चित्र आहे.
प्रतिबंधत्मक उपाय करणे आवश्यक
कोणताही आजार होण्याआधीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. जेणेकरून तो वाढून स्वत:ला व इतरांना संसर्ग होऊ नये. हिवाळ्याच्या दिवसात त्वचेला तेल लावणे, डोळे पाण्याने धुणे गरजेचे आहे. त्वचा कोरडी पडू देता कामा नये. या दिवसात पूर्ण अंग झाकेल, असे कपडे वापरणे आवश्यक आहे. हिवाळ्यात व्यक्तिगत स्वच्छता राखणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी इतरांना संसर्ग होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसात सकाळी लवकर बाहेर पडणे हानिकारक होऊ शकते. कारण सकाळच्या वेळेला प्रदूषित कण हवेच्या खालच्या थरात जमा होतात, तसेच ज्यांना दमा व इतर श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी सकाळी लवकर बाहेर पडूच नये.
- दीपक हडवळे, आरोग्यतज्ज्ञ
वाहनांची वाढती संख्या, वाढती बांधकामे, इतर प्रदूषणामुळे वातावरणावर धुळीचे सावट असून, धूळ वातावरणाच्या खालच्या स्तरावर साचत आहे. शहरातील तापमानात सातत्याने बदल नोंदविण्यात येत असून, निर्माण होत असलेले धुरके ‘ताप’दायक ठरत आहे.
लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्धांसाठी असे वातावरण धोकादायक असून, यावर उपाय म्हणून तोंडाला मास्क लावणे, त्वचेला तेल लावणे, डोळे वेळोवेळी पाण्याने धुणे, संसर्ग टाळणे, आजार होण्याअगोदरच प्रतिबंधात्मक उपचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
संतुलन ठेवणे गरजेचे
वातावरण गार असते. परिणामी, धुक्यामुळे धूलिकणांचा थर वातावरणात साचतो. त्यामुळे श्वसनाचे व त्वचेचे आजार कमी वयात लवकर जाणवतात. वाहनांच्या धुरामधून बाहेर पडत असलेल्या प्रदूषणकारी वायुंमुळे शरीरावर परिणाम होतात. सर्दी, कफ तर त्वचा कोरडी पडणे व डोळे चुरचुरणे अशा प्रकारचे विकार होतात.
- संजय शिंगे, पर्यावरणतज्ज्ञ
प्रतिकारात्मक औषधे उपलब्ध व्हावीत
हिवाळ्यात त्वचेचे आजार वाढले असून, त्यावर उपचारासाठी वापरली जाणारी औषधे जास्त प्रतिकारात्मक नाहीत. त्यामुळे त्वचेच्या आजार लवकर बरे होत नाहीत. त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे, हाताला व पायाला फोड येणे ही प्राथमिक लक्षणे दिसून येतात. यावर उपाय म्हणजे त्वचेची काळजी घेणे, त्वचा कोरडी पडू न देता तिला मऊ ठेवणे. ऊन जास्त असेल तर सनस्क्रीन लावणे, तसेच या दिवसांत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.
- स्नेहल हडवले, त्वचारोगतज्ज्ञ
संध्याकाळी चालावे
फुप्फुसाचे आजार, दम लागणे, दमा होणे, टी.बी.च्या आजारांमध्ये वाढ होत आहे. सतत खोकला येणे, ताप येणे, कफ होणे, श्वसनाची गती वाढणे, सकाळी चालल्यावर धाप लागणे, यासारखे लक्षणे सुरुवातीला दिसून येतात. रुग्णांची संख्या वाढली असून, त्यात लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्ध माणसे आहेत. हवेतील प्रदूषण याला मुख्यत: कारणीभूत असून, यातील धूळ, वाहनांचा धूर, यामुळे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी वॉक करण्याऐवजी सायंकाळी वॉक करावे, तसेच मास्क लावणे, प्रतिकारात्मक लस घेणे गरजेचे आहे.
- मनोज मस्के, श्वसनविकारतज्ज्ञ
धूलिकण मानवी आरोग्यास हानिकारक
वातावरणातील हवेमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले
आहे. त्यामुळे अनेक आजार होत आहेत. प्रदूषणामुळे हवेतील कणाचे प्रमाण वाढत आहे. हवेतील कणांचे प्रमाण हे वातावरणातील धूलिकणांवर अवलंबून आहे. मुंबईतील बांधकामातून निघणारी माती, सिमेंटचे कण, तसेच वाहनांतून निघणारा धूर व इतर केमिकल्समुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहेत. कार्बन सल्फेट, नाइट्रेड यासारखे वायू मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
- गुफरान बेंग, प्रकल्प संचालक, सफर