सामाजिक बांधिलकीमुळेच पत्रकारिता टिकून
By admin | Published: January 17, 2017 05:59 AM2017-01-17T05:59:30+5:302017-01-17T05:59:30+5:30
पत्रकारितेने समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे
बीड : पत्रकारितेने समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे. वृत्तपत्रांचे अर्थशास्त्र अवघड आहे. मात्र, केवळ सामाजिक बांधिलकीमुळे पत्रकारिता टिकून आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना स. मा. गर्गे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. सन्मानचिन्ह व १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री पंकजा मुंडे होत्या. तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. रजनी पाटील, आ. जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, आदींची या वेळी उपस्थिती होती.
अग्रलेख हा वृत्तपत्राचा आत्मा आहे; मात्र काही दैनिकांत त्याचा अभाव अशी खंत व्यक्त करीत राजकीय प्रवासात वर्तमानपत्रे कशी दिशादर्शक ठरली, याचे अनेक दाखले पवार यांनी दिले. ‘वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना एका वृत्तपत्राने ‘हे राज्य पडावे, ही श्रींची इच्छा’ अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला. त्यानंतर मी काही सहकाऱ्यांसोबत ‘उद्योग’ केला अन् राज्य बदलले. त्यानंतर ‘वेडात दौडले वीर मराठे आठ’ अशा मथळ्याखाली अग्रलेख छापून आला. वृत्तपत्रांचे अर्थशास्त्र मला अजून कळले नाही. मात्र, केवळ विचार देण्याची भूमिका व सामाजिक बांधिलकी यामुळेच ही वृत्तपत्रसृष्टी टिकून आहे,’ असेही पवार पुढे म्हणाले.
‘वृत्तपत्रांद्वारे ज्ञानात भर पडते. मी विरोधी पक्षात असताना माझ्या भावना वृत्तपत्रांतून जशाच्या तशा उमटत होत्या. आता मात्र लेखणी व कॅमेऱ्याचा धाक वाटतो. आपले प्रतिबिंब आपल्याला ओळखू येत नाही. मात्र, वृत्तपत्रांतून ते प्रकट होते. या क्षेत्रात प्रगल्भ मंडळींची गरज आहे,’ असे पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या. (प्रतिनिधी)