खान्देशात दुबार पेरणीही वाया जाण्याची भीती
By admin | Published: July 13, 2017 05:03 AM2017-07-13T05:03:10+5:302017-07-13T05:03:10+5:30
सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव/ धुळे/ नंदुरबार : सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली आहे. जळगाव जिल्ह्यात दुबार पेरणीही वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अटळ असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनियमित पावसामुळे केवळ ४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
भरपावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात तब्बल ४५ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ४० टक्के पेरण्यांनी कसाबसा तग धरला असून, ६० टक्के पेरण्या वाया जाण्याची स्थिती आहे. तब्बल २० दिवस पावसाने दडी मारली आहे. बियाणे वाया गेल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी झाली. मात्र बियाण्यास व कोंबांना किडे, मुंग्या लागू लागल्या आहेत.
जिल्ह्यात १० जुलैपर्यंत केवळ १९.७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे.
धुळे जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारली. पीकवाढीच्या टप्प्यात पाऊस होत नसल्याने त्यांची वाढ खुंटली असून, ती जळण्याच्या मार्गावर आहेत. मूग, उडीद या कडधान्यांसह सोयाबीन, मका पिकांनाही या खंडाचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्याला अनियमित पावसाचा फटका बसला असून, आतापर्यंत केवळ ४३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे़ जिल्ह्यात निर्धारित दोन लाख ६९ हजार क्षेत्रापैकी ३० जूनपर्यंत केवळ दोन हजार ७३५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या.