दहावीच्या विद्यार्थ्याची गळफासाने नालासोपाऱ्यात आत्महत्या
By admin | Published: March 1, 2017 02:58 AM2017-03-01T02:58:44+5:302017-03-01T02:58:44+5:30
नालासोपारा येथील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रवीण जाधव (१७) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
विरार : नालासोपारा येथील दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रवीण जाधव (१७) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हॉल तिकीट न मिळाल्याने प्रवीणने आत्महत्या केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर अद्याप कुणाही विद्यार्थ्याला हॉल तिकीट दिले नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.
नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी येथील रिया अपार्टमेंटमध्ये प्रवीण आपल्या आईवडिलांसह रहात होता. रविवारी रात्री तो घरी एकटाच अभ्यास करीत होता. आई रात्री घरी परतली त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला ओढणीच्या साहय्याने लटकलेला आढळून आला.
शाळेने हॉल तिकीट न दिल्याने तो तणावात होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. शाळेने हा आरोप फेटाळून लावला आहे. सध्या मौखीक परिक्षा सुरु आहेत. शाळेने अद्याप कुणालीही हॉल तिकीट दिलेले नाही. ४ मार्चपासून हॉल तिकीट दिले जाणार असून तशी नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे, असे शाळेकडून सांगण्यात आले.
त्याच्या पालकांच्या आरोपानंतर आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकाकडे चौकशी केली. त्यांनी कुणालाच हॉल तिकिट दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे परिक्षेच्या तणावामुळे की अन्य कारणामुळे त्याने आत्महत्या केली त्याचा तपास करत आहोत, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली. यामुळे या परिसरावर शोककळा पसरलेली आहे. (वार्ताहर)