बघ्यांमुळे आंदोलनात भर
By admin | Published: August 13, 2016 03:13 AM2016-08-13T03:13:26+5:302016-08-13T03:13:26+5:30
बदलापूर रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे प्रवाशांचे आंदोलन सुरू झाल्यावर तास-दीड-तासातच ते पाहण्यासाठी, आंदोलकांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढत गेली.
बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे प्रवाशांचे आंदोलन सुरू झाल्यावर तास-दीड-तासातच ते पाहण्यासाठी, आंदोलकांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रवाशांची गर्दी वाढत गेली. बघ्यांच्या या गर्दीमुळे रुळांवर आंदोलक आणि फलाटांवर, रस्त्यांवर, पुलांवर त्यांचा उत्साह वाढवणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यातही आंदोलनाच्या ठिकाणी सेल्फी काढून, आंदोलनाचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची घाई असल्याने काही काळ आंदोलनाबद्दल परस्परविरोधी माहिती पसरत गेल्याने गोंधळाचे वातावरण होते. कधी नव्हे, इतक्या आंदोलनाच्या क्लिप सतत शेअर होत होत्या.
सततच्या उशिराबद्दल, बिघाडाबद्दल रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची तीव्रता इतकी होती की, त्याचे निमित्त सापडल्याने प्रत्येकाने रेल्वेवर तोंडसुख घेत प्रत्यक्ष-सोशल मीडियावर जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पहाटे रेल रोको आंदोलन सुरू झाले. जेवढे प्रवासी आंदोलनात उतरले होते, त्यापेक्षाही जास्त प्रवासी बघ्याच्या भूमिकेत होते. ज्यांना कोणत्याही परिस्थितीत हजेरी लावण्यापुरते का होईना आॅफिसला जायचे होते, असे प्रवासी एकीकडे वाहतूक पूर्ववत होण्याच्या प्रतीक्षेत होते. लवकरच आंदोलन संपेल आणि आपण लोकल पकडून कामावर जाऊ, या अपेक्षेने शेकडो प्रवासी स्थानकात खोळंबलेले उभे होते. आंदोलनकर्त्या शेकडो प्रवाशांसोबतच त्यांचा उत्साह वाढवणारे अनेक प्रवासी फलाटांवर, बाजूच्या रस्त्यांवर, पुलांवर उभे होते.
आंदोलक आणि पोलिसांतील जुगलबंदी ऐकणे, रेल्वे प्रशासनापुढे मांडल्या जाणाऱ्या मागण्यांवेळी प्रतिसाद देणे, पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी जोर लावताच एकच गलका करत आंदोलकांचे मनोबल वाढवणे, अशी कामे या बघ्यांकडून सुरू होती.
नेमके काय घडतेय, हे पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढून, क्लिप तयार करून त्या पाठवण्याची धडपडही मोठी होती. प्रत्येक जण आंदोलन आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होता. रेल्वेविरोधात आंदोलन असल्याने या चित्रीकरणातून पुढे आंदोलकांना अडचण निर्माण होईल, असा सूर उमटताच आंदोलनकर्त्यांनी काही काळ फोटो काढू नयेत, शूटिंग करू नये, अशी हाक दिली. त्यानंतरही जे फोटो काढत होते, त्यातील काहींना फटकावण्याचे कामही झाले.
मात्र, याच सोशल मीडियामुळे रेल्वेमंत्र्यांपर्यंत आंदोलन पोहोचल्याचे, त्यांनी दखल घेत डीआरएमना ते पाठवल्याचे टिष्ट्वट करताच आंदोलनकर्ते निर्धास्त झाले. त्यांचे मनोबल वाढले. त्यामुळे स्थानिक पातळीवरून कोणी कितीही समजावण्यासाठी आले, तरी डीआरएम येईपर्यंत माघार नाही, ही भूमिका आंदोलकांनी घेतली. चर्चा पुढे सरकली नाही. थेट दिल्लीतूनच अधिकृत आश्वासन द्या, असाही हट्ट काही आंदोलकांनी धरला. त्यातून आंदोलन सहा तास सुरूच राहिले.
पोलिसांनी सकाळी १० वाजता या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्याचा पहिला मोठा प्रयत्न केला. मात्र, त्याला उपस्थित इतर प्रवाशांचाही विरोध झाल्याने पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. पोलीस ज्याज्या वेळी प्रवाशांना दूर करण्यासाठी येत, तेव्हा आंदोलकांशी त्यांची होणारी बाचाबाची टिपण्यासाठी लगेचच शेकडो कॅमेरे सुरू होत. त्यामुळे बळजबरीने आंदोलकांना दूर करण्याचे प्रयत्न पोलिसांना सोडून द्यावे लागले.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केल्यावर लागलीच फलाटांवरील प्रवासी जोरजोरात घोषणा देत होते.
आंदोलनाशी कोणताही संबंध नसताना वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा आंदोलनकर्ते देत होते. या सर्वांपासून हातभर लांब राहून आंदोलन संपण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेकडो रेल्वे प्रवाशांनी बघ्याचीच भूमिका घेतली. आंदोलन संपल्यावर पहिली लोकल सुटताच फलाटांवरील गर्दी कमी होऊ लागली. त्यामुळे आंदोलन संपण्याची वाट पाहणारे, अडकून पडलेले प्रवासीही भरपूर होते, ते स्पष्ट झाले. गाड्या सुरू होताच आंदोलकही कमी झाले. काही गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने पळाले; तर आंदोलनाचे नेतृत्व करणारे मात्र प्रश्नांची तड लावण्यासाठी लेखी आश्वासन, रेल्वेशी चर्चा करण्यासाठी थांबून राहिले. (प्रतिनिधी)