अवकाळी पावसाने रब्बीला दिलासा
By admin | Published: November 25, 2015 03:56 AM2015-11-25T03:56:48+5:302015-11-25T03:56:48+5:30
राज्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे मत, राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे : राज्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे मत, राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी व्यक्त केले. मात्र, डाळिंब, द्राक्षे, कांदा या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे डावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या पिकांवर फवारणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या जो पाऊस पडत आहे, त्यात वादळ वा गारपीट झालेली नाही. त्यामुळे या पावसाचा पिकांना नुकसान होण्याऐवजी लाभच झालेला आहे. सोलापूर, अहमदनगर, बीड, पुणे, उस्मानाबाद, सातारा आदी भागात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
हा बहुतांश भाग रब्बी क्षेत्रात येतो. त्यामुळे ज्वारीला फायदा होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे फळबागांचे मात्र नुकसान होऊ शकते. त्यामुळे या बागांवर फवारणी करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. रब्बीची राज्यात सुमारे ६० टक्के पेरणी झालेली आहे.
तृणधान्य ५७ टक्के, कडधान्य ६८ टक्के, तेलबियांची १५ टक्के पेरणी झाली आहे. जूनमध्ये १०३ टक्के पाऊस झाल्याने, मूग व उडीद या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. त्यानंतर दोन महिने पाऊस न पडल्याने या पिकांचे मराठवाड्यात नुकसान झाले. त्यांच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे, परंतु या पावसाने तूर पिकाला लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.