वरिष्ठांच्या त्रासामुळे न्यायालयात धाव

By admin | Published: January 9, 2017 05:18 AM2017-01-09T05:18:04+5:302017-01-09T05:18:04+5:30

वाहतूक नियंत्रण शाखेत सुरू असलेला गैरव्यवहार व भष्ट्राचाराबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, यासाठी आपण गेल्या तीन वर्षांपासून

Due to the sufferings of the superiors, the court is in court | वरिष्ठांच्या त्रासामुळे न्यायालयात धाव

वरिष्ठांच्या त्रासामुळे न्यायालयात धाव

Next

जमीर काझी / मुंबई
वाहतूक नियंत्रण शाखेत सुरू असलेला गैरव्यवहार व भष्ट्राचाराबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, यासाठी आपण गेल्या तीन वर्षांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पुराव्यानिशी पाठपुरावा करीत होतो. त्याबाबत कार्यवाही तर दूरच उलट मला त्याबाबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धमक्या देण्यात आल्या व खोट्या तक्रारींना सामोरे जावे लागले. त्यामुळे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासामुळेच मन कणखर होऊन त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले, असे हवालदार सुनील भगवान टोके यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेतील गैरव्यवहाराविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचार कसा फोफावला आहे? हे त्यांनी ‘रेटकार्ड’सह पुराव्यानिशी मांडले. शिस्तीला महत्त्व असलेल्या पोलीस खात्यातील गैरप्रकाराविरुद्ध एका हवालदाराने उच्च न्यायालयात धाव घेण्याची राज्यातील बहुधा ही पहिलीच घटना आहे. या प्रकारामुळे पोलीस दलासह गृह विभागही चक्रावून गेला आहे. त्यामुळे टोके यांची भेट घेवून त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून न्यायालयात जाण्यापर्यंतची सविस्तर माहिती दिली. वरिष्ठांनी वेळीच चौकशी केली असती तर संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम बसला असता मात्र त्यांना पाठीशी घातले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास
असून, त्याद्वारे भ्रष्टाचार करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसेल, याची खात्री आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्याशी झालेली काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे...
प्रश्न : हवालदार असूनही वरिष्ठांविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्याचे धैर्य कसे दाखविले?
सुनील टोके : पोलीस दलातील सर्वात खालच्या स्तराचा घटक म्हणून कार्यरत असलो, तरी गेली ३२ वर्षे आपण प्रामाणिकपणे नोकरी बजावित आहोत. चांगले पोलीस स्टेशन, ड्युटीसाठी कधीही कोणाकडे मागणी केली नाही. ज्या ठिकाणी नियुक्ती होईल, तेथे काम केले. २०१४ मध्ये वाहतुकीमध्ये बदली झाल्यानंतर, या ठिकाणी सुरू असलेल्या गैरव्यवहाराचे अनुभव मिळाले. ते उघड करण्यासाठी आवश्यक पुरावे, मोबाइल क्लिप मिळवून २०१४ मध्ये विभागाच्या तत्कालीन प्रमुखांना सादर करून त्यांची भेट मागितली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ३ ते ४ महिन्यांनी त्यांच्या कार्यालयाकडून बोलावून घेतले गेले व केवळ बाहेर बसविण्यात येई. मात्र, भेट दिली नाही. त्यानंतर, दुसरे प्रमुख हजर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भेट घेतली असता, त्यांनी ऐकून घेण्याऐवजी अत्यंत उद्धट व अपमानास्पद वागणूक दिली. तरीही आपण पुराव्याच्या आधारे संबंधित प्रकरणाबाबतची ‘आरटीआय’अंतर्गत माहिती मागत होतो. मात्र, वाहतूक शाखेकडून त्याला काहीच उत्तर दिले जात नसल्याने, पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गृहसचिव, मुुख्यमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा केला. गेली अडीच वर्षे हे काम सुरू आहे. मात्र, आपल्या तक्रारीबाबत कारवाईऐवजी आपल्याला धमकाविणे, मानसिक त्रास देण्याचे प्रकार होत राहिले. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक सुनावणीमध्ये आपल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने, कोर्टाने याचिका दाखल करून घेतली.
प्रश्न : वरिष्ठांकडून कशा प्रकारे धमक्या, त्रास देण्यात आला?
सुनील टोके : वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीत व फोनवरून अनेक वेळा धमकाविले आहे. खात्यातून बडतर्फ करण्याची वारंवार धमकी देण्यात आली आहे. इतकेच नाही, तर मला मधुमेहामुळे रोज इन्श्युलीन घ्यावे लागते. मात्र, आपल्या डॉक्टरांकडे परस्पर पोलिसांना पाठवून, फोन करून खोटा रिपोर्ट बनवित असल्याचा आरोप केला. क्राइम ब्रँचमधील एसीपींनी चौकशीच्या निमित्ताने बोलावून आपण पुरविलेल्या सीडी मिळवून, ज्यांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप आहे त्यांना दिल्या. त्यांच्या सूचनेनुसार जबाब नोंदवून मलाच गोत्यात आणण्याचे प्रयत्न केले गेले. या सर्व प्रकाराबाबतच्या नोंदी, पुरावे आपल्याकडे तारखेनिशी आहेत.
प्रश्न : वाहतूकमधील भ्रष्टाचाराबाबत काय पुरावे आहेत ?
सुनील टोके : ‘आरटीआय’अंतर्गत मिळविलेली कागदपत्रे, तसेच प्रत्येक चौकीतून कोण हप्तावसुलीचे काम करतो, किती व कोणा-कोणाला हप्ता दिला जातो, याबाबत मोबाइलवर झालेल्या संभाषणाच्या २७ सीडी कोर्टाला सादर केल्या आहेत. त्याशिवाय वरिष्ठांनी आपल्याला धमकाविल्याबाबतचे मोबाइलचे संभाषण आहे. सुनावणीच्या वेळी कोर्टात ते सादर करणार आहोत. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, त्याद्वारे भ्रष्टाचार करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसेल, याची खात्री आहे.

 

हवालदार टोके मूळचे सातारा जिल्ह्यातील असून १९८५ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. गेल्या ३२ वर्षांच्या सेवेत जवळपास २० वर्षे त्यांना एल-ए व साइड पोस्टिंग देण्यात आले. केवळ आझाद मैदान व नागपाडा पोलीस ठाण्यात काही वर्षे नियुक्ती झाली होती. वरळी येथील पोलीस वसाहतीतील १६० चौरस फुटांच्या खोलीत पत्नी, दोन मुले, मुलगी व सुनेसह ते राहतात.
प्रत्येक चौकीतून कोण हप्ता वसुलीचे काम करतो, किती व कोणा कोणाला हप्ता दिला जातो, याबाबत मोबाइलवर झालेल्या संभाषणाच्या २७ सीडी कोर्टाला सादर केल्या आहेत. त्याशिवाय वरिष्ठांनी आपल्याला धमकाविल्याबाबतचे मोबाइलचे संभाषण आहे, असे टोके यांनी सांगितले.

Web Title: Due to the sufferings of the superiors, the court is in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.