खडसे विरोधकांच्या मदतीला धावल्याने सत्तापक्षाची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:18 AM2017-08-11T04:18:41+5:302017-08-11T04:18:44+5:30
अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा हक्क असतो या विरोधी पक्षांच्या ठाम भूमिकेला चक्क माजी मंत्री आणि भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची आज चांगलीच पंचाईत झाली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा हक्क असतो या विरोधी पक्षांच्या ठाम भूमिकेला चक्क माजी मंत्री आणि भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांची आज चांगलीच पंचाईत झाली. या वेळी झालेल्या गदारोळात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावात परस्पर बदल करण्यात आल्याचा आरोप सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. विशेषत: काही खात्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मुद्दे वगळण्यात आल्याचा त्यांचा आक्षेप होता. विरोधकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही विषय प्रस्तावातून वगळण्याची परंपरा नाही. मी विरोधी पक्षनेता असतानाही असे घडत नव्हते, असे सांगत खडसे हे विरोधकांच्या मदतीला धावले. त्या नंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले.
तत्पूर्वी, अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा अधिकार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. मात्र विधिमंडळाच्या नियमानुसार अंतिम आठवडा प्रस्तावात केवळ एक विषय नमूद करण्याचे स्वतंत्र विरोधकांना आहे याकडे लक्ष वेधून एकाच वेळी अनेक खात्यांचे विषय उपस्थित करण्याची नवी परंपरा सुरु झाली आहे असे सांगत आघाडीचे सरकार असताना विरोधकांच्या प्रस्तावात बºयाचवेळा असे बदल केले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे अध्यक्षांवर असे आरोप करू नयेत, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. तर संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी मंत्री केवळ एका खात्याच्या विषयालाच उत्तर देतील, १०-१२ खात्यांच्या प्रश्नांना न्याय देता येत नाही. मंत्री त्याला उत्तर देणार नाहीत, असे बजावले. दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांनी याला आक्षेप घेतला़