स्वाइन फ्लूमुळे डोंबिवलीत एकाचा मृत्यू
By admin | Published: July 10, 2017 03:46 AM2017-07-10T03:46:26+5:302017-07-10T03:46:26+5:30
सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या नरेंद्र केळूसकर (५०) यांचा स्वाइन फ्लूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सुनीलनगरमध्ये राहणाऱ्या नरेंद्र केळूसकर (५०) यांचा स्वाइन फ्लूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत जानेवारीपासून सात महिन्यांत ४८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यातील तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक महिला ही टिटवाळा येथे राहणारी होती. ती जेजुरीला देवदर्शनाला गेली होती. नंतर ग्रोग्रासवाडीत १७ वर्षीय तरुणाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते.
केळूसकर यांच्या स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्युला एम्स रूग्णालयाने दुजोरा दिला. या रुग्णालयात आणखी एक स्वाइन फ्लूचा रुग्ण उचपार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. साथीच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. तसेच स्वाइन फ्लूचे रुग्णही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
डासांचे प्रमाण वाढले
पावसाने दडी मारल्यानंतर कल्याण-डोंबिवली सहरांत डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास स्वाइनपाठोपाठ, डेंग्यू, मलेरियाचे रूग्णही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्य बिघडले
स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्युपैकी दोन डोंबिवली व एक टिटवाळा येथील आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावातही रूग्ण आहेत. पण त्याची पालिकेकडे नोंद नाही. येथील आरोग्य व्यवस्था पालिकेकडे हस्तांतरीत झालेली नाही. तेथील अनेक रूग्ण खाजगी रूग्णालयात आहेत.