अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 05:01 PM2024-09-22T17:01:55+5:302024-09-22T17:02:40+5:30
महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असून भाजपाला २८८ पैकी १६० जागा लढवायच्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी किती जागा लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रात कोणाचीही सत्ता आली तरी मंत्रिपद कायम असलेल्या रामदास आठवलेंनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने आपल्या पक्षाला १०-१२ जागा द्याव्यात अशी मागणी केली आहे. लोकसभेलाही आठवलेंनी जागांची मागणी केली होती, परंतू त्यांना एकही जागा देण्यात आली नव्हती. यामुळे आतातरी आधीच आपल्यासाठी जागा सोडविण्यासाठी झगडत असलेली भाजपा आठवलेंच्या पक्षाला जागा देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आरपीआय-आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवलेंनी सांगितले की, त्यांचा पक्ष पक्षाच्याच निवडणूक चिन्हावर लढणार आहे. विदर्भात आम्हाला ३-४ जागा हव्या आहेत. यामध्ये उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड आणि वाशिम हे मतदारसंघ मिळावेत अशी मागणी करणार आहे.
महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असून भाजपाला २८८ पैकी १६० जागा लढवायच्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी किती जागा लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतच जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना आणखी एक घटकपक्ष रिपाई-आठवले गटाने १०-१२ जागांची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
आम्ही संभाव्य १९ मतदारसंघांची निवड केली आहे. ते आम्ही महायुतीतून लढणार आहोत. यापैकी कमीतकमी १० ते १२ जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येकी ४ जागा आपल्याला सोडाव्यात अशी मागणी आठवलेंनी केली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू अजित पवार आल्याने ते आम्हाला मिळाले नाही, अशा शब्दांत आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.
येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने पाहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. तर मोठे पक्ष एकमेकांचे मोहरे फोडण्याच्या कामी लागले आहेत. विधानसभेत भाजपचे १०३, शिवसेना ४०, राष्ट्रवादी ४१, काँग्रेस ४०, शिवसेना (यूबीटी) १५, राष्ट्रवादी (शरद पवार) १३ आणि इतर २९ आमदार आहेत.