गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 07:09 AM2024-05-11T07:09:46+5:302024-05-11T07:10:42+5:30

थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली.

Due to group differences, the match is sloppy'; Internal factionalism may affect both the candidates pune lok sabha Election | गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका

गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका

- सचिन कापसे 
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने अतिशय आक्रमकतेने पुण्यात काम करत लोकसभेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा फोकस जानेवारीपासूनच पुण्यावर होता. त्यामुळे भाजपने तगडा मराठा उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली. त्यानंतर अंतर्गत गटबाजीच्या चर्चाही काही काळ रंगल्या. हेच काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही घडले. कसब्याच्या विजयानंतर चर्चेत आलेल्या रवींद्र धंगेकरांना महाआघाडीने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर  झाल्यानंतर लगेच पक्षांतर्गत कलह समोर आला. 

थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पूर्वी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंतर्गत गटबाजी आणि मतांच्या ध्रुवीकरणामुळे अटीतटीची होणार आहे. सामना कोण जिंकणार हे निकालानंतरच स्पष्ट हो.

अंतर्गत कलहामुळे वाढणार डोकेदुखी
nपुणे लोकसभा क्षेत्रातील ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. १ आमदार अजित पवार गटाचे तर १ काँग्रेसचे आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर भाजपाला वरवर फायदा दिसत असला तरी अंतर्गत कलहाची मुळे मोठ्या पदाधिकाऱ्यांपासून तर  नगरसेवकांपर्यंत पसरलेली आहेत. 
nकाँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काही पदाधिकारी नाराज झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी तर आपली नाराजी जाहीर व्यक्त करत काही दिवस प्रचारापासूनही ते दूर राहिले होते. वरिष्ठांनी समजून काढल्यानंतर आता ते प्रचारात दिसत आहेत. 

सामाजिक समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न 
nतगडा मराठा उमेदवार देत भाजपने सामाजिक समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देत काँग्रेसने ओबीसींना जवळ घेण्याचा प्रयत्न केला. थेट दुरंगी लढत होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला रिंगणात उतरवण्यात आले. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
वाहतूक कोंडी हा पुणेकरांचा कळीचा मुद्दा आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही तास वाया जातात. 
 पिण्याच्या पाण्यासाठी अनेक उपनगरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. टँकरच्या आतील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असते.  
 वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठी रस्त्यांची कामे तसेच ब्रिज आणि मेट्रोच्या विस्ताराची गरज आहे. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. 

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?
वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते    टक्के
२०१४    अनिल शिरोळे    भाजप    ५,६९,८२५    ३१.०४
२००९    सुरेश कलमाडी    काँग्रेस    २,७९,९७३    १५.४९
२००४    सुरेश कलमाडी    काँग्रेस    ३,७३,७७४    ४८.००
१९९९    प्रदीप रावत    भाजप    ३,०४,९५५    ४१.६२
१९९८    विठ्ठल तुपे    काँग्रेस    ४,३४,९१५    ५२.७९

Web Title: Due to group differences, the match is sloppy'; Internal factionalism may affect both the candidates pune lok sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.