मोठी बातमी! भाजपातील 'हे' २४ नेते अस्वस्थ; लवकरच ४-५ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:03 PM2024-09-03T12:03:02+5:302024-09-03T12:06:18+5:30
विधानसभा लढायचीच आहे त्याशिवाय पर्याय नाही असा आत्मविश्वास असणारे काही नेते त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र काही ठिकाणी पक्षांतर होऊ शकते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात इच्छुक उमेदवारांनी आपापली तिकीट फायनल करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यात हसन मुश्रीफ यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे नाराज झालेले भाजपा नेते समरजितसिंह घाटगे यांनी पक्षाला रामराम केला. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे आज शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजितसिंह घाटगे तुतारी चिन्हावर लढतील हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र भाजपात समरजितसिंह घाटगे यांच्यासारखे २४ नेते अस्वस्थ आहेत, ज्यातील ४-५ जण पक्ष सोडण्याच्याही तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की, भाजपाकडे २४ नेते असे आहेत जे अजित पवारांच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीने लढत देऊ शकतात. आता या २४ जणांना आपलं पुढची वाटचाल कशी राहील अशी चिंता आहे त्यामुळे थोडी अस्वस्थता आहे. ४-५ भाजपा नेते हे शरद पवारांकडे जातील पण त्याठिकाणी गेल्यानंतर तिथे तुतारी लावणारे खूप आहेत असंही त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.
तसेच आम्ही प्रत्येकाशी बोलतोय, समरजितसिंह घाटगे यांच्याशीही आम्ही चर्चा केली. हर्षवर्धन पाटील यांच्याशी देवेंद्र फडणवीसांनी खूप वेळा चर्चा केली. समरजितसिंहला थांबायचे नव्हते. त्यांना विधानसभा निवडणूक लढायचीच आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला. भाजपात जे इनकमिंग झाले त्याठिकाणी तितक्या ताकदीचे उमेदवार नव्हते तिथे इतरांना पक्षात घेतलं जातं. जेवढं प्रभावी नेतृत्व पक्षात आणलं जातं, तेव्हा पक्ष वाढतो. हर्षवर्धन पाटलांना मागे उमेदवारी दिली ते पराभूत झाले. आता पुन्हा निवडणूक आली आहे. महायुतीत आता परिस्थिती वेगळी आहे. महायुती नसती तर ते उमेदवार झाले असते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ज्यांना थांबायचे नाही, विधानसभा लढल्याशिवाय मार्गच नाही असे २-४ लोक जातील. त्यांच्या राजकीय आयुष्याला आम्ही का ब्रेक लावायचा. दुसऱ्याकडे जाऊन निवडून येतील असं त्यांना वाटतंय, भाजपा उमेदवारी देऊ शकत नाही अशा प्रकरणात आम्ही कसं रोखणार?. निवडून येतील असा आत्मविश्वास आहे ते जातील. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. सरकार आणि सरकारनंतरही ज्या ज्याठिकाणी ताकद द्यावी लागते ते आम्ही देतो. केंद्रात आपलं सरकार आहे. तिथे काही व्यवस्था आहे तिथे सामावून घेऊ असं सांगितले जात आहे. त्याशिवाय असेही बरेच जण आहेत त्यांना तिकीट नाही दिले तरी त्यांना घाई नाही. पक्ष सांगेल ते करू अशी भूमिका घेतात त्यांचीही यादी मोठी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.