राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; खात्यावरून तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 07:45 AM2023-07-13T07:45:37+5:302023-07-13T07:46:09+5:30

मुख्यमंत्र्यांकडे आमदारांची नाराजी, राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन करताना अगदी सुरुवातीला जे शिवसेना आमदार शिंदे यांच्यासोबत गेले त्यांनाच मंत्रिपदापासून वंचित राहावे लागल्याने अस्वस्थतेत भर पडली आहे

Due to NCP's pressure system, Shiv Sena is very uneasy | राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; खात्यावरून तणाव

राष्ट्रवादीच्या दबावतंत्रामुळे शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; खात्यावरून तणाव

googlenewsNext

यदु जोशी  

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करू नका असा दबाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिंदे समर्थक आमदारांनी वाढविला आहे. विस्तारावरून शिंदे गट खूपच आक्रमक झाला असून या गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातच राष्ट्रवादीने मलाईदार खात्यांचा आग्रह धरल्याने अस्वस्थतेत भर पडली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन करताना अगदी सुरुवातीला जे शिवसेना आमदार शिंदे यांच्यासोबत गेले त्यांनाच मंत्रिपदापासून वंचित राहावे लागल्याने अस्वस्थतेत भर पडली आहे. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना आधी खातेवाटप करावे आणि नंतर विस्तार करावा असे ठरत असल्याची कुणकुण लागताच अत्यंत आक्रमक झालेल्या शिंदे गटातील आमदारांनी नाराजीचे स्पष्ट सूर लावले आहेत. आधी राष्ट्रवादीला खातेवाटप अजिबात करू नका आणि करतच असाल तर ते मागतील ती खाती अजिबात देऊ नका अशी गळ या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातली आहे. आपण भाजपसोबत मित्र म्हणून गेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकीय सोईसाठी सोबत आला आहे, त्यांना आताच वजनदार खाती दिली तर ते पुढे सगळ्यांना दबावात ठेवतील अशी भावना शिवसेनेच्या किमान सहा ज्येष्ठ आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली असल्याचे समजते. 

तिढा नेमका कशामुळे?  
राष्ट्रवादीने अर्थ, ग्रामविकास, ऊर्जा, परिवहन, जलसंपदा, महिला बालकल्याण अशा महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला आहे. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतरही खातेवाटप जाहीर होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादीला वजनदार खाती द्यायची अन् मग विस्तार करून आपल्या मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती द्यायची हे शिंदे यांना मान्य नसल्याचे समजते. विशिष्ट खाती देण्यासाठीचा राष्ट्रवादीचा दबाव झुगारून देण्याची भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याने आता चेंडू दिल्लीच्या कोर्टात आहे. तर भाजपकडील काही वजनदार खाती राष्ट्रवादीला देण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध दर्शविल्याने तिढा कायम आहे, असेही सूत्रांनी सांगितले.  

तीन पक्षांची लवकरच समिती
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांनी एकमेकांवर टीका करण्याचे प्रकार घडू लागल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच तीन पक्षांची समन्वय समिती नेमली जाण्याची शक्यता आहे. वादाचे विषय या समितीमध्ये आधी चर्चिले जातील व त्यावर शिंदे-फडणवीस- पवार यांचा निर्णय अंतिम असेल.

विस्तारही रखडला
एकीकडे खातेवाटप रखडलेले असताना मंत्रीमंडळ विस्तारही रखडला आहे. मागील दोन आठवड्यांपासून मंत्रीमंडळ विस्तार एक-दोन दिवसात होणार अशी चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार त्याबद्दल जाहीरपणे भाष्यही करत आहेत. मात्र मंत्रीमंडळ विस्तार काही होत नाही. आता शनिवार किंवा रविवारी मंत्रीमंडळ विस्तार होईल अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Due to NCP's pressure system, Shiv Sena is very uneasy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.