मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:33 AM2024-07-03T08:33:59+5:302024-07-03T08:34:38+5:30

विधानसभेचे संख्याबळ २७४ इतके आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा २३ वर आला आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारांचे अर्ज

Due to the three candidates of the Mahavikas Aghadi, the election of the Vidhan Parishad is square | मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी

मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी

 मुंबई - विधानसभेत  पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उतरवून जोखीम पत्करल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, ५ जुलै ही उमेदवारी अर्ज घेण्याची शेवटची तारीख असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की घोडेबाजार होणार हे त्याच दिवशी ठरेल. 

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.  या अर्जांची आज, बुधवारी छाननी होणार आहे. आणखी दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले असले तरी त्यावर दहा आमदारांच्या सह्या नसल्याने ते अर्ज छाननीत बाद ठरतील. 

विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होत आहे. भाजपच्या पाच, शिंदे सेना आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, उद्धवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने  मंगळवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आजच्या घडीला ११ जागांसाठी १२ अर्ज आहेत.

महाविकास आघाडीने सुरुवातीला दोन जागा लढविण्याची तयारी केली होती. यापैकी एक जागा काँग्रेस लढणार आणि दुसऱ्या जागेसाठी शरद पवार गट आणि उद्धवसेना शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देतील, असे चित्र होते. मात्र, उद्धवसेनेने सोमवारी रात्री मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने निवडणुकीची गणिते बदलली आहेत. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे शिंदेसेना आणि अजित पवार गट सावध झाला आहे.

कोटा २३ मतांचा
विधानसभेचे संख्याबळ २७४ इतके आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा २३ वर आला आहे.  विधानसभेत काँग्रेसचे ३७, उद्धवसेनेचे १५ आणि शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख उद्धव सेनेसोबत आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते. आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज असल्याने आणखी तीन  मतांसाठी आघाडीची  मदार समाजवादी, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष या छोट्या पक्षांवर  तसेच अपक्ष आमदारांवर आहे.  दोन वर्षांपूर्वी झालेल्या काँग्रेसची मते फुटून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस २३पेक्षा जास्त मतांचा कोटा निश्चित करू शकते. त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव सेनेला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची तजवीज करावी लागू शकते.

शिंदेसेनेतर्फे गवळी, तुमाने
शिंदे गटाने मावळत्या आमदार मनीषा कायंदे यांना उमेदवारी नाकारली. भाजपच्या आग्रहामुळे लोकसभेचे तिकीट कापलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली. अजित पवार गटाने परभणीतील नेते राजेश विटेकर आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे.  उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर व शेकापचे जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरले.  

यांचे अर्ज दाखल  
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत,अमित गोरखे,
शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव
उद्धव सेना : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील

Web Title: Due to the three candidates of the Mahavikas Aghadi, the election of the Vidhan Parishad is square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.