मुसळधार पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 03:23 PM2017-08-29T15:23:03+5:302017-08-29T21:31:59+5:30
मुंबई, दि. 29 - मुंबईत मंगळवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गणेशोत्सव मंडळांना त्वरित वीज ...
मुंबई, दि. 29 - मुंबईत मंगळवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गणेशोत्सव मंडळांना त्वरित वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. परिसरात पावसाचे साचल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्व गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा खंडित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळानी जे सेवक नेमले आहेत त्यांना गणपतीच्या मंडपात हजर राहण्यास सांगावे, अशीही सूचना करण्यात आली आहे. शिवाय, ज्या गणेश मंडळाना काहीही मदत हवी असल्यास त्वरित समितीशी संपर्क साधावा व आपली माहिती कळवण्यास सांगण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाचा नंबर - १९१६, २२६९४७२५ ते २७ यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे.
मुसळधार पावसामुळे डबेवाल्यांची सेवाही विस्कळीत
मुबईकरांसाठी नेहमी धावणा-या डबेवाल्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहोचवण्याची सेवा विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डबेवाले जागोजागी अडकून पडले आहेत, अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा आगमन केलेल्या पावसाने मंगळवारी सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरुप आलं आहे. गेल्या 24 तासात 152 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी धावणा-या मुंबईचा वेग आज कमी झालेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.