राज्यकर्त्यांच्या उफराटा कारभारामुळे बळीराजाची कोंडी - उद्धव ठाकरे

By admin | Published: March 27, 2017 08:03 AM2017-03-27T08:03:32+5:302017-03-27T08:05:24+5:30

शिवसेनेने विरोधकांसारखे वागणे सोडून द्यावे यासाठी भाजापाकडून शिवसेनेची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना मात्र..

Due to the uproar of the rulers, the victim has been arrested - Uddhav Thackeray | राज्यकर्त्यांच्या उफराटा कारभारामुळे बळीराजाची कोंडी - उद्धव ठाकरे

राज्यकर्त्यांच्या उफराटा कारभारामुळे बळीराजाची कोंडी - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - शिवसेनेने विरोधकांसारखे वागणे सोडून द्यावे यासाठी भाजापाकडून शिवसेनेची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना मात्र सरकार विरोधाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून, रोजच्या सामनाच्या अग्रलेखातून याचा प्रत्यय येत आहे. मंत्रालयात रामेश्वर हरिभाऊ भुसारे या शेतक-याला झालेल्या मारहाणीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 
 
रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. पण त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! अशा शब्दात उद्धव यांनी आपल्याच सरकारवर टीका केली आहे. नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर पोलिसांनी बेदम मारून फरफटत खाली आणले. हे संतापजनक तर आहेच, पण त्यापेक्षाही निर्दयपणाचे आणि लाजिरवाणे असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.  
 
कर्जमुक्ती करू नका. नुकसानभरपाई देऊ नका, पण शेतकऱ्यांना असे लाथाबुक्क्यांनी तुडवू तरी नका. एकीकडे निसर्गाचा लहरी कारभार आणि दुसरीकडे राज्यकर्त्यांचा उफराटा कारभार अशा कोंडीत बळीराजा सापडला आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. कर्जमुक्ती नाही, नुकसानभरपाई नाही, प्रेमाचे व आधाराचे दोन शब्ददेखील त्यांच्या वाट्याला आले नाहीत. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! रामेश्वर भुसारे तुम्हीच सांगा, आता काय करायचे? एक नम्र विनंती तुमच्या कुटुंबासाठी, कृपा करून आत्महत्येच्या मार्गाने जाऊ नका!
 
-  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असतानाच महाराष्ट्राच्या मंत्रालयात शेतकऱ्याचे रक्त सांडले आहे. कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणाऱया 19 आमदारांना सरकारने निलंबित केले आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर पोलिसांनी बेदम मारून फरफटत खाली आणले. हे संतापजनक तर आहेच, पण त्यापेक्षाही निर्दयपणाचे आणि लाजिरवाणे आहे. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांची रक्तबंबाळ अवस्थेतील छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर घडावा याचे दुःख वाटते. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत पारदर्शकपणे जाहीर केले आहे की, ‘‘कर्जमुक्ती होणार नाही.’’ निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने लोकांनी विसरून जावीत. ‘‘कर्जमुक्ती केल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची ‘हमी’ देता काय?’’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. रामेश्वर हरिभाऊ भुसारे बहुधा अशी हमी देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले असावेत. 2015 साली झालेल्या गारपिटीत त्यांचे प्रचंड नुकसान झाले.
 
-  ‘‘कर्जमुक्तीचे नंतर पाहू, निदान नुकसानभरपाई तरी द्या’’ असे विनवण्यासाठी ते आले व पोलिसांनी त्यांना झोडपून काढले, पण उलटा प्रकार असा की, पोलिसांनी सांगितले, ‘‘त्यांना  मारहाण वगैरे काही झाली नाही. उलट त्यांनीच पोलिसांना चावे घेतले व स्वतःस जखमा करून घेतल्या.’’ पोलिसांचे हे सांगणे धादांत खोटे व मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे आहे. एक निःशस्त्र, भुकेने व्याकूळ झालेला हतबल शेतकरी सशस्त्र व आडदांड पोलिसांचे चावे घेतो व आमचे पोलीस हे चावे सहन करतात यावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास तरी कसा ठेवला? कर्जमुक्ती करू नका. नुकसानभरपाई देऊ नका, पण शेतकऱ्यांना असे लाथाबुक्क्यांनी तुडवू तरी नका. शेतकरी चावे घेतो म्हणजे काय? तो काय पिसाळलेला कुत्रा आहे काय? यंदा मान्सून चांगला गेला, त्यामुळे पीकपाणी बरे आले हे खरे आहे. मात्र आधीचा चार-पाच वर्षांचा दुष्काळ, नापिकी, अधूनमधून बसणारा गारपिटीचा तडाखा यामुळे सामान्य शेतकरी पिचून गेला आहे. केवळ एका वर्षाच्या चांगल्या मान्सूनने तो खंबीरपणे उभा राहील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. पुन्हा आताही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा खरीप पिकाला बसलाच आहे. 
 
- शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्यामुळे हिरावून घेतला गेला आहे. सरकारने नेहमीप्रमाणे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आणि नुकसानभरपाई देण्याचे वायदे केले आहेत. मात्र येथे 2015 मधील गारपिटीची नुकसानभरपाई  रामेश्वर भुसारे यांना अद्यापि मिळालेली नाही. ती त्यांनी मागितली तर त्यांना पोलिसी लाथबुक्क्यांचा ‘प्रसाद’ खावा लागला. पुन्हा त्यांनीच चावे वगैरे घेतल्याच्या उलट्या बोंबाही ऐकून घ्याव्या लागल्या. एकीकडे निसर्गाचा लहरी कारभार आणि दुसरीकडे राज्यकर्त्यांचा उफराटा कारभार अशा कोंडीत बळीराजा सापडला आहे. तो हतबल होतो आणि शेती करण्याची ऊर्मी हरवून बसतो तो त्यामुळेच. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू दारू पिऊन झाल्याची मुक्ताफळे काँग्रेस पुढाऱ्यांनी उधळलीच होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमभंगामुळे होत असल्याचे इरसाल विधानही तेव्हा झाले. होय, शेती ही त्यांची आई, बायको, प्रेयसीच आहे व तिचे हे भयंकर नुकसान झालेले पाहून प्रेमभंगच होतो. रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. कर्जमुक्ती नाही, नुकसानभरपाई नाही, प्रेमाचे व आधाराचे दोन शब्ददेखील त्यांच्या वाट्याला आले नाहीत. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! रामेश्वर भुसारे तुम्हीच सांगा, आता काय करायचे? एक नम्र विनंती तुमच्या कुटुंबासाठी, कृपा करून आत्महत्येच्या मार्गाने जाऊ नका!
 

Web Title: Due to the uproar of the rulers, the victim has been arrested - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.