महिलेच्या सतर्कतेमुळे चोर २४ तासांत गजाआड
By Admin | Published: July 19, 2016 04:19 AM2016-07-19T04:19:10+5:302016-07-19T04:19:10+5:30
रुग्णालयातून परतत असताना, एका महिलेवर सोनसाखळी चोराने हल्ला करत, तिचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : रुग्णालयातून परतत असताना, एका महिलेवर सोनसाखळी चोराने हल्ला करत, तिचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याला विरोध करताच, त्याने महिलेवर हल्ला करत पळ काढला. याबाबत महिलेने तत्काळ पोलिसांना माहिती देताच नेहरूनगर पोलिसांनी या सराईत आरोपीला २४ तासांत अटक केली असून, ईश्वर काळे (२५) असे त्याचे नाव आहे.
ज्योती सरदार असे या प्रकरणातील महिलेचे नाव असून, ती नेहरूनगर परिसरात राहते. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ती तिच्या बहिणीला रुग्णालयात बघण्यासाठी गेली होती. काही वेळाने ती घरी परतत असताना चेंबूरच्या टेंभी ब्रिजजवळ एका सोनसाखळी चोराने तिच्यावर हल्ला करत, तिचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याला विरोध केल्याने चोराने महिलेला मारहाण केली. त्यानंतर, अर्धवट तुटलेले मंगळसूत्र घेऊन पळ काढला. या हल्ल्यात महिलेच्या मानेवर मार लागला. त्यामुळे स्थानिकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केली. नेहरूनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी महिलेची भेट घेत गुन्हा दाखल केला, तसेच महिलेने आरोपीला पाहिले असल्याने पोलिसांनी तत्काळ रेखाचित्र तयार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपरडे यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत, आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले. या पथकाकडून शोध सुरू असतानाच रेखाचित्रामधील आरोपी हा चेंबूर परिसरातीलच राहणारा असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत ईश्वर काळे (२५) या आरोपीला शनिवारी अटक केली. चौकशीत त्याने अनेक महिलांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली (प्रतिनिधी)
नेहरूनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी महिलेची भेट घेत गुन्हा दाखल केला, तसेच महिलेने आरोपीला पाहिले असल्याने पोलिसांनी तत्काळ रेखाचित्र तयार केले.
रेखाचित्रामधील आरोपी हा चेंबूर परिसरातीलच राहणारा असल्याचे पोलिसांना समजले.