दृश्य माध्यमांमुळे विनोद ढासळला
By admin | Published: January 19, 2016 01:32 AM2016-01-19T01:32:21+5:302016-01-19T01:32:21+5:30
लखित विनोद ढासळवण्यास दृश्य माध्यमे जबाबदार आहेत, असा आरोप लेखिका मंगला गोडेबोले यांनी केला. वृत्तवाहिन्यांवर पुरुषांना साडी नेसवून त्यांच्याकरवी हिडीस अभिनयातून विनोदनिर्मिती केली जाते.
संजय माने, ज्ञानोबा तुकारामनगरी (पिंपरी)
लखित विनोद ढासळवण्यास दृश्य माध्यमे जबाबदार आहेत, असा आरोप लेखिका मंगला गोडेबोले यांनी केला. वृत्तवाहिन्यांवर पुरुषांना साडी नेसवून त्यांच्याकरवी हिडीस अभिनयातून विनोदनिर्मिती केली जाते. हा बाईपणाचा अपमान आहे. हे थांबले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले.
‘अभिरुचीसंपन्न विनोद आणि आजचे मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. साहित्य संमेलनात लक्ष्मीबाई टिळक सभागृहात हा परिसंवाद झाला. त्यामध्ये डॉ. राजेंद्र नाईकवाडे, संजय मून, रवी आमले, श्रीकांत बोजेवार यांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षपदावरून गोडबोले बोलत होत्या.
समीक्षक राजेंद्र नाईकवाडे म्हणाले, ‘‘विनोदी साहित्य हे क्षणजीवित्व आहे. विनोदी साहित्यातून उत्तम साहित्याची अपेक्षा बाळगली जात नाही. बाजारपेठेतील गरजेनुसार विनोदी साहित्याची निर्मिती होत असल्याने ते कसदार राहत नाही. विनोदी साहित्य असे लेबल लावलेल्या साहित्यात विनोद आढळून येत नाही. परंतु, जेथे लेबल नाही, तेथे विनोद आढळून येतो.’’
समीक्षक संजय मून यांनी सांगितले, ‘‘विनोदी लेखक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या चक्रात लेखक अडकला आहे. असे असताना अलीकडच्या काळात विनोदी लेखक अशी ओळखही नाकारण्याचा प्रयत्न लेखकांकडून होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार म्हणाले, ‘‘वृत्तपत्रातील लेखन तत्कालीन असते, पण निष्कर्ष तत्कालीन नसतात. विनोदी लेखनात सूडबुद्धी नसावी. जवळच्या व्यक्तीलासुद्धा लेखनातून चिमटा काढता आला पाहिजे. वाचनाची अभिरुची सर्वात जास्त राजकारण्यांमध्ये असते. शिवाय, त्यांच्यात सहिष्णुताही दिसून येते. लेखन ही लेखकाची प्रवृत्ती आहे. सर्कशीतील विदुषकाला दोरीवर चांगली कसरत करता येते. म्हणूनच तो दोरीवरून घसरण्याचा अभिनय करतो.