भाकरीसाठी भटकंती; चंद्रपूर जिल्ह्यातील गावे ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:14 PM2018-10-31T23:14:45+5:302018-11-01T11:11:50+5:30
निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली.
शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: निसर्गाचा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने दरवर्षीच काळवंडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीही निसर्गाचा फटका बसला. हिरवीगार झालेली पिके करपून गेली. आता शेतीसाठी काढलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर ऊसतोड मजूर म्हणून चक्क दिवाळीपूर्वीच गाव सोडण्याची पाळी आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत ऊसतोडीसाठी जाणाऱ्या मजुराच्या संख्येत वाढ झाली असून दिवाळीला झगमगणारी गावेही दिवाळीपूर्वीच ओसाड दिसत आहे.
अतिदुर्गम जिवती तालुक्यात संपूर्ण कोरडवाहू शेतकरी असून निसर्गाच्या भरवशावर शेती करून संसाराचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी उत्पादनात झालेली घट यंदाच्या खरीप हंगामात भरून निघेल, या आशेने मोठ्या जोमाने खरीप हंगामाची लागवड केली. सुरूवातीचा समाधानकारक पाऊस अन नंतर पडलेला उघाड, यामुळे फुलोऱ्यात आलेली पिके करपली. अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आता करायचे कसे? शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? यावर्षी सावकरी कर्ज व बॅक कर्ज फेडले नाही तर पुढच्या वर्षी कर्ज मिळणार नाही. या भीतीपोटी शेतकरी ऊसतोड मजूर म्हणून स्थलांतरीत झाले आहेत.
दरवर्षी आनंदाने घरी दिवाळी साजरी करून मग रोजगाराच्या शोधात भटकंती करायची. मात्र यावर्षी त्या शेतकऱ्यांना दिवाळी ऊसाच्या फडातच साजरी करावी लागणार आहे. कामाच्या शोधात मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा शोध अजूनही संपलेला दिसत नाही.
एकीकडे शासन मागेल त्याला काम व कामानुसार दाम मिळेल, असा नारा वाजवित असले तरी प्रत्यक्षात अजूनही रोजगार हमी योजनेचा श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे पहाडावरील मजुरांना वर्षानुवर्षे रोजगाराच्या शोधात गाव सोडण्याची पाळी येते. यावेळी तर ऐन दिवाळीतच शेतकऱ्यांना गाव सोडावे लागत आहे.
भयंकर दुष्काळ
सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पहाडावरील कोरडवाहू शेतकरी आनंदी झाला होता. परंतु नंतरच्या परतीच्या पावसाने सतत उघाड दिल्याने खरीप हंगामातील कापूस पिकावर लाल्या रोग पडून पीक करपले. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. असे असतानाही शासनाने जिवती तालुक्यात पाऊस झाल्याच्या कारणावरून जिवती तालुक्याचे नाव दुष्काळी यादीतून वगळले गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र आहे.