जलसंधारणामुळे पाणीसाठे बनले दमदार
By admin | Published: June 5, 2017 01:14 AM2017-06-05T01:14:49+5:302017-06-05T01:14:49+5:30
खेड तालुक्यातील सांडभोरवाडी, तिन्हेवाडी गावाला भौगोलिक देणगीतून मोठे वनक्षेत्र लाभले आहे
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील सांडभोरवाडी, तिन्हेवाडी गावाला भौगोलिक देणगीतून मोठे वनक्षेत्र लाभले आहे. त्यात जलसंधारणाच्या कामाबरोबरच वृक्षलागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. डोंगरकुशीत वनतळी, माती बंधारे, सिमेंट बंधारे त्याचबरोबर समतल चर झाल्याने माती, जमिनीची झीज थांबून मुरलेल्या पाण्यामुळे परिसरातील पाणीसाठे दमदार बनले आहेत.
काही वर्षांपूर्वी टंचाईग्रस्त असलेल्या या गावात आता उन्हाळी बागायती पिके होऊ लागली आहेत. अन्नधान्याने समृद्धी वाढत असताना पूरक व्यवसायांनादेखील संधी मिळत आहे. दूध व्यवसाय, बी-बियाणे, खते विक्रीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी गावात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
गावाच्या उत्तर बाजूने डोंगररांगा आहेत. यामध्ये २१२ हेक्टर वन क्षेत्र आहे. ८२ एकर गायरान आहे. या क्षेत्रात सन २०११ पासून वन विभाग आणि गावातील वनसंरक्षण समितीच्या माध्यमातून विविध प्रजातीची फळे देणारी आणि इमारतीसाठी लाकडाचा उपयोग होणारी ९२ हजार ६०० झाडे लावण्यात आली आहेत. यातील ९५ टक्के झाडे जिवंत आणि चांगल्या स्थितीत आहेत. तसा वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाचा अहवाल समितीकडे प्राप्त आहे. महाराष्ट्र शासनाने गतवर्षी २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यात सहभाग घेताना सांडभोरवाडीने एकाच दिवशी ५२ हजार झाडांची लागवड करून विक्रम केला. गावातील महिला, मुलांचा त्यात उल्लेखनीय सहभाग होता.
राजगुरुनगर विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस, समितीचे निवृत्त सचिव बाळासाहेब निकम, सचिव आर. गोकुळे या सर्वांचे सहकार्य त्यांना लाभत आहे. या सर्व कामांची दखल घेऊन शासनाने सांडभोरवाडी वन संरक्षण समितीला पुरस्कार देऊन गौरविले आहे. राज्याचे वन, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते पुण्यातील विधान भवन येथे २९ मे २०१७ रोजी या वन समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार समारंभ पूर्वक देण्यात आला. सांडभोरवाडी वन संरक्षण समितीच्या कामाची प्रेरणा इतर गावांनी घेण्यासारखी आहे.
या शाळांमधील विद्यार्थीसुद्धा वन विभागाच्या उपक्रमात नेहमीच सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात वृक्षलागवड आणि संवर्धनाचे उपक्रम साजरे होतात. जनजागृतीतही विद्यार्थी अग्रभागी आहेत. घराभोवतीच्या रिकाम्या जागेत, शेताच्या बांधावर वृक्षलागवड होत आहे. त्याचे संवर्धन करताना विद्यार्थ्यांकडून पालकांकडे आग्रह धरला जातो.
स्वयंपाक करण्यासाठी जळाऊ लाकडाची तोड थांबावी म्हणून गरज असेल अशा प्रत्येकाला वन विभागाच्या माध्यमातून वनसमितीने अनुदान तत्त्वावर कायमस्वरूपी गॅसजोड दिले आहेत. आता शंभर टक्के गॅस झाल्याने धूर आणि प्रदूषणमुक्त गाव झाले आहे.
वन समितीच्या अध्यक्षा कविता पाचारणे या साडेचार वर्षांपूर्वी सांडभोरवाडीच्या सरपंच झाल्या. त्यानंतर सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अवघ्या काही महिन्यांतच गावात ‘वनचेतना’ गृहाची उभारणी केली.
या केंद्रात वन समितीच्या बैठका पार पडतात. एकत्र आल्याने वनसंवर्धनाचे धोरण आखले जाते. वन समितीच्या माध्यमातून जलसंधारण आणि वृक्षलागवडीची नियोजनबद्ध कामे केल्याने अप्रत्यक्षपणे गावात प्रत्येकाला वन क्षेत्राचा लाभ मिळत आहे.