पाणीटंचाईमुळे ‘हागणदारीमुक्ती’ बारगळली

By admin | Published: May 6, 2016 02:14 AM2016-05-06T02:14:49+5:302016-05-06T02:14:49+5:30

राज्यातील यंदाच्या भीषण पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हागणदारीमुक्त गाव अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कुठून आणणार, असा

Due to water scarcity, the 'Hagmansh Mukti' came to an end | पाणीटंचाईमुळे ‘हागणदारीमुक्ती’ बारगळली

पाणीटंचाईमुळे ‘हागणदारीमुक्ती’ बारगळली

Next

- अतुल जयस्वाल, अकोला

राज्यातील यंदाच्या भीषण पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हागणदारीमुक्त गाव अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी आता शौचविधीसाठी पुन्हा ‘बाहेर’चा मार्ग पत्करला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १६८ गावे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ठेवले होते. मार्च २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्यात या अभियानास उत्तम प्रतिसाद मिळून ६८ गावे हागणदारीमुक्त घोषित केली गेली.
मात्र, यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तर अभूतपूर्व जलसंकट निर्माण झाले. प्यायला पाणी मिळणेही दुरापास्त झाले. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, तिथे शौचालयासाठी पाणी कुठून आणणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थ शौचविधीसाठी गावाबाहेरील रस्ता, माळरान किंवा नदीकाठाचा वापर करताना दिसून येत आहेत.

उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र झाल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शौचालयाचा वापर टाळण्याकडे लोकांचा कल आहे. हागणदारीमुक्त झालेल्या गावांतील स्वच्छता समितीने लोकांना शौचालय वापरण्यासाठी प्रवृत्त करावे.
- समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, अकोला

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही आमचे गाव हागणदारीमुक्त केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालये उभारून लोकांना त्याचा वापर करण्यास प्रवृत्त केले. आता पाणीटंचाईने कळस गाठला आहे. त्यामुळे लोकांना नाइलाजाने शौचासाठी बाहेर जावे लागत आहे. पुरेसा पाणीपुरवठा झाल्यास ही समस्या निकाली निघेल. - सुनील परनाटे, सरपंच, निराट, अकोला

Web Title: Due to water scarcity, the 'Hagmansh Mukti' came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.