चुकीच्या सर्वेक्षणामुळे लाभार्थी वंचित
By admin | Published: July 14, 2017 03:41 AM2017-07-14T03:41:45+5:302017-07-14T03:41:45+5:30
इंदिरा आवास घरकुल योजनेसाठी चुकीचे सर्व्हेक्षण केल्यामुळे लाभार्थ्यांना तिच्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
हुसेन मेमन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील गावांचे इंदिरा आवास घरकुल योजनेसाठी चुकीचे सर्व्हेक्षण केल्यामुळे लाभार्थ्यांना तिच्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका सर्व्हेक्षणामुळे आदिवासी लाभार्थ्यांना बसला आहे.
तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायतीतील मेढा व रामनगर ही दोन महसूल गावे, तसेच पाडे लहान मेढा, मोठा मेढा, कातकरीपाडा, तांबटीपाडा, कोलणीपाडा, येथील पाड्याचे सन- २०११ च्या प्रतिक्षा यादीनुसार दारिद्र्य रेषेखालील घरकुल योजनेसाठी सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे या गावं पाड्यातील एकही लाभार्थी इंदिरा आवास घरकुल योजनेला पात्र ठरला नाही.
कोरतड पैकी महसूल गावे मेढा व रामनगर आणि महसूल गावांचे पाच पाडे आहेत. त्यामुळे ही दोन्ही महसूली गावे मिळून ४४३ कुटुंबे आहेत. पैकी १०३ कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील असून त्यांची साधी कुडाची घरे आहेत. तसेच कातकरी पाड्यातील शंभर टक्के आदिवासी कुटुंबे ही आदिम जातीतील असल्याने दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यामुळे त्यांना इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणे आवश्यक होते. मात्र, त्या वेळच्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे या गोरगरीब आदिवासी कुटुंबांना घरकुल योजनेच्या लाभापासून मुकावे लागत आहे.
कोरतड मधील मेढा व रामनगर या महसूल गावांतील दारिद्र्य रेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली तरी काहीही उपयोग झाला नाही. तसेच ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या लाभार्थ्यांनी ‘ड’ फार्म भरून पंचायत समितीकडे जमा करावा. असे सांगण्यात आले. त्यामुळे अशा कुटुंबांनी ‘ड’ फार्म जव्हार पंचायत समितीकडे जमा केले आहेत.
कोरतड ग्रामपंचायतीतील दारिद्र्य रेषेखालील गरिब आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण झाले की नाही झाले असल्यास ते कोणी केले? याबाबत अजूनपर्यंत कोणतीही माहिती आदिवासींना देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या ज्या अधिकारी व कर्माचा-यांच्या निष्काळजीपणामुळे गरीब आदिवासी कुटुंबांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे.
> इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ, प्रतिक्षा यादीत ज्यांची नांवे असतील त्यानांच घेता येतो या सर्वेक्षणा बाबत मी काही बोलू शकत नाही.
-प्रशांत सोनेरी, ग्रामसेवक कोरतड
सन २०११ च्या इंदिरा आवास घरकुल योजनेचा सर्व्हे चुकीचा झाला आहे. त्यामुळे कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील शंभराहून अधिक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेच्या लाभापासून मुकावे लागले आहे. त्यामुळे आता आम्ही उपोषणास बसणार आहोत.
-परशुराम खुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य- कोरतड