सागरी मार्गाला पर्यावरण विभागाचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:09 AM2017-08-03T04:09:00+5:302017-08-03T04:09:02+5:30
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे.
कमलाकर कांबळे।
नवी मुंबई : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला पर्याय उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने दोन सागरी मार्ग प्रस्तावित केले आहेत. वाशी-ठाणे व पामबीच मार्गाला समांतर असा वाशी ते बेलापूर अशा दोन सागर किनारी मार्गाच्या प्रकल्पाच्या खर्चाची जबाबदारी एमएमआरडीएने स्वीकारली आहे. परंतु पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी या बहुद्देशीय प्रकल्पाला खीळ बसली आहे.
शहराचा विस्तार होत असल्याने लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग व ठाणे-बेलापूर हे तीन मार्ग शहरवासीयांसाठी उपलब्ध आहेत. परंतु या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूककोंडी होते आहे. यातच आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडणार आहे.
ही वस्तुस्थिती लक्षात घेवून महापालिकेने दोन सागर किनारी मार्ग प्रस्तावित केले आहेत. या मार्गाच्या उभारणीसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने महापालिकेने यापूर्वीच एमसीझेडएमएकडे प्रस्ताव सादर केला आहे. हे दोन्ही मार्ग खर्चिक आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने या दोन्ही मार्गाची निर्मिती करावी, असा पालिकेचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएने या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाशी ते ऐरोली दरम्यानच्या १२ किमी लांबीच्या मार्गाची निर्मिती होणार आहे. वाशीगाव येथून खाडी किनाºयावरून कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोली व दिघा या उपनगरांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. सध्या मुंबईहून येणाºया वाहनांना या उपनगरांत जाण्यासाठी वाशी-कोपरखैरणे किंवा ठाणे-बेलापूर मार्गाचा अवलंब करावा लागतो. प्रस्तावित सागर किनारी मार्गावर उपनगरात प्रवेश करण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. असे असले तरी पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी मागील
तीन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरअभियंता मोहन डगांवकर यांच्याशी बोलायला सांगितले. मात्र डगांवकर यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
प्रकल्पाचा खर्च ५०३८ कोटी अपेक्षित-
वाशी ते ठाणे (१६.९ किमी) व वाशी ते बेलापूर (१0.५ कि.मी) या दोन प्रस्तावित आठ पदरी मार्गासाठी ५0३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च अवाढव्य व महापालिकेला झेपणारा नाही. शिवाय हे दोन्ही मार्ग एमएमआर क्षेत्रात येत असल्याने प्रादेशिक विकासाचा भाग म्हणून हा खर्च एमएमआरडीएने उचलावा, अशी विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यास एमएमआरडीएने तयारी दर्शविल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.