दुमदुमला जयघोष तुकाराम- तुकाराम नामाचा.. देहूनगरीत फुलला भक्तिमळा बीजोत्सवाचा.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:22 PM2019-03-22T12:22:52+5:302019-03-22T12:29:42+5:30
तुकाराम -तुकाराम असा आसमंत दणाणारा जयघोष..., माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षांवर झालेली बेल-लाह्या फुलांची झालेली उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष-लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला...
विश्वास मोरे /मंगेश पाडे
श्री क्षेत्र देहूगाव : इंद्रायणीतीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम -तुकाराम असा आसमंत दणाणारा जयघोष..., माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षांवर झालेली बेल-लाह्या फुलांची झालेली उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष-लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला.
श्री संत तुकाराम महाराजांचा ३७१ वा बीजोत्सव सोहळयासाठी गेल्या दोन दिवसांपासून भाविक देहूनगरीत दाखल झाले आहेत. भजन कीर्तन आणि प्रवचनाने देहूनगरी भक्तीमय झाली आहे. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर दिंडीकरी व फडकरी यांचे ठिकठिकाणी गाथा पारायण सुरू आहे. सोहळ्यासाठी श्री संत तुकाराममहाराज संस्थानासह ग्रामपंचायत प्रशासन व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून आले. कडकोड बंदोबस्त तैनात केला आहे.
संस्थानाच्या वतीने पहाटे ३ ला काकड आरती, ४ वाजता श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते झाली. पहाटे सहाला श्री संत तुकाराम महाराज मंदिरातील महापूजा झाली. साडेदहाला देऊळवाड्यातून पालखीचे वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान झाले. माध्यान्ही सूर्य येताच वैकुंठगमन सोहळा प्रसंगावर देहूकर महाराजांचे कीर्तन सुरू होते. त्याचवेळी इंद्रायणीतीरावरील वैकुंठस्थान येथे तुकाराम -तुकाराम असा आसमंत दणाणारा जयघोष झाला. माध्यान्ही नांगदुरकीच्या वृक्षांवर झालेली बेल-लाह्य फुलांची झालेली उधळण, अशा अपूर्व उत्साहात लक्ष-लक्ष नेत्रांनी बीज सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. त्यानंतर दुपारी साडेबाराला पालखी परत मुख्य मंदिरात आली.
भाविकांच्या गदीर्ने इंद्रायणीतीर फुलून गेला होता. अपूर्व उत्साह जाणवत होता. रात्री व सकाळी पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम, मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर आणि जन्मस्थान मंदिर परिसरात होणार असल्याचे संस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे यांनी सांगितले.
हरिनामाच्या गजरात बरोबर बारा वाजून आठ मिनिटांनी नादुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, तसेच पार्थ पवार यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, अपर तहसीलदार गीता गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते
क्षणचित्रे
१) मंदिरात ३२ छुपे कॅमेरे, पोलिसांसह सुमारे २०० स्वयंसेवक.
२) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पुरेसा पाणीपुरवठा
३) प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने गाथा मंदिर, मुख्य मंदिर
४) वैकुंठगमन मंदिर परिसरात बाह्यरुग्ण विभाग सुरू.
५) आरोग्य सहायक, परिचारिका, आरोग्यसेवक आणि चार वैद्यकीय अधिकारी, ४ रुग्णवाहिका, एक कार्डियाक रुग्णवाहिका.