दारूनिर्मिती करणारे हात गुंतले श्रमदानात
By admin | Published: May 23, 2016 04:51 AM2016-05-23T04:51:48+5:302016-05-23T04:51:48+5:30
दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई (जि. बीड)
दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या या गावकऱ्यांनी केवळ ४५ दिवसांत श्रमदानातून गावचे परिवर्तन घडवून आणले. परिवर्तनाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून गावठी दारू बनवण्याचे बंद करण्याचा सामूहिक निर्धारही या गावाने केला आहे, हे येथे उल्लेखनीय!
राडीतांडा हे ९५० लोकवस्तीचे गाव. गावात एकूण १५२ कुटुंबे राहतात. गेल्या येथील ग्रामस्थ ३० वर्षांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी जातात. गावातील १७ कुटुंबे गावठी दारू बनवतात.
या वर्षी भीषण दुष्काळाच्या स्थितीमुळे ऊसतोडीसाठी कुठूनही बोलावणे आले नाही. अशा स्थितीत उदरनिर्वाह करायचा कसा? या मुख्य समस्येचे निराकरण करण्यासाठी गावचे परिवर्तन हेच विकासाकडे नेऊ शकते, या उद्देशाने ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे, ग्रामसेवक विनोद देशमुख, यांनी ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. श्रमदानाच्या माध्यमातून गावात जलक्रांतीचे विविध कामे होऊ लागली. गेल्या ४५ दिवसांत ग्रामस्थांनी गावाचा संपूर्ण कायापालटच करून दाखविला.
ग्रामस्थांनी श्रमदानातून गायरानात १५ फूट लांब व दोन फूट रूंद व दोन फूट खोल असे ५,२०० समान समपातळी चर खोदले. या प्रत्येक चरामध्ये एका पावसात ९०० लिटर पाणी जमिनीत मुरते.
एकदा पाऊस पडला तर ५,२०० चराच्या माध्यमातून ४६ लाख ८० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. गावातील ११ विहिरी व २८ विंधन विहिरींचे पुर्नभरण करण्यात आले आहे. गावातील ९४ हेक्टरवर बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. सांडपाणी मुरवण्यासाठी शोषखड्डेही तयार करण्यात आली आहेत.