डम्पिंगचे आगसत्र सुरू
By Admin | Published: March 7, 2017 03:32 AM2017-03-07T03:32:12+5:302017-03-07T03:32:12+5:30
उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली
कल्याण : उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली आहे. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या मागील बाजूस सोमवारी दुपारी लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुरांचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आगीवर सायंकाळी उशिरा नियंत्रण मिळवले. दरम्यान, यासंदर्भात स्थानिक नगरसेवक व भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी वारंवार लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नुकताच पत्रव्यवहार केला होता. परंतु, वास्तव पाहता त्यांच्याही पत्राला वाटाण्याच्या अक्षता केडीएमसी प्रशासनाने लावल्याचे पाहावयास मिळत आहे.
पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंगवर प्रतिदिन ६५० टन कचरा टाकला जातो. या डम्पिंगची क्षमता संपुष्टात आल्यानंतरही तेथे कचरा टाकणे सुरूच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे एकीकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले असताना त्यातच उन्हाळ्यात कचरा पेटण्याचे सत्रही सुरूच असल्याचे पुन्हा सोमवारी समोर आले आहे. मागील वर्षी जानेवारीपासून आगी लागण्याचे सत्र सुरू झाले होते. ते मे महिन्यापर्यंत कायम होते. मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीचा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो आणि तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते. आगीचे प्रमाण अधिक असेल, तर धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच नजीकच्या वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरत जातात.
दरम्यान, उन्हाळ्यात कचऱ्याला आगी लागण्याच्या घटना वारंवार घडतात. उन्हात कचरा तापतो. त्यात कचऱ्यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. यावर उपाय म्हणून पाण्याच्या पाइपलाइन डम्पिंगमध्ये टाक ल्या जाणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. आजवर यासंदर्भात ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आगी लागण्याचे सत्र सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)
>यापूर्वीच्या घटना
मागील वर्षी २, ११, ३१ जानेवारी, २१ मार्च आणि २८ मार्चला डम्पिंगला ागी लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर ३१ मे ला लागलेली आग सलग तीन दिवस धुमसत होती.
यापूर्वी २०१० मध्ये डम्पिंगला मोठी आग लागली होती. ३१ मे च्या आगीच्या घटनेच्यावेळी वाढती आग आणि धूर पाहता डम्पिंगला लागून असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. यात तीन कचरावेचकही किरकोळ जखमी झाले होते.
या वाढत्या घटना पाहता डम्पिंगवर मातीचा भराव टाकून आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांनी डम्पिंगची पाहणी केली होती. साठेनगरमधील रहिवाशांचीही त्यांनी संवाद साधला होता.
डम्पिंग बंद होण्यासाठी लागणारा दीड वर्षे लागणार असल्याने बायोगॅस प्रकल्पाद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा देवळेकर यांनी केला होता. परंतु, त्याचीही ठोस कार्यवाही झालेली नाही.