ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत

By admin | Published: April 27, 2015 03:33 AM2015-04-27T03:33:49+5:302015-04-27T03:33:49+5:30

राज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या

Dump Panic in the Suspension | ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत

ऊसपट्ट्यात बिबट्याची दहशत

Next

संदीप भालेराव, नाशिक
राज्याच्या वन विभागाला सध्या भलतीच चिंता सतावत आहे. जंगलात राहणाऱ्या बिबट्याने आता उसाच्या शेतात आपला आश्रय शोधल्याने बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्षदेखील वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईचा आकडा कोटींच्या घरात पोहचल्याने बिबट्याच्या या वास्तव्याचे करायचे काय, असा प्रश्न वन विभागापुढे निर्माण झाला आहे. नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी म्हणे अवघ्या राज्याला बिबट्याच्या शहरातील वास्तव्याचे करायचे काय, यावर अभिप्राय विचारला आहे.
शहरालगत आणि ग्रामीण भागातही बिबट्याने आता उसाच्या शेतातच निवारा शोधला आहे. काही वर्षांपूर्वी बिबटे पाणी आणि शिकारीसाठी मळे, शेती आणि रहिवासी क्षेत्रात येत असत आणि परिसरात एकदा दिसलेल्या बिबट्याचे पुन्हा दर्शन घडत नसे; परंतु आता हे चित्र बदलले आहे. बिबट्याने उसाच्या शेतात ठाण मांडणे सुरू केल्याने धोका वाढला आहे.. जंगली प्राण्यांचा हा नैसर्गिक अधिवास नसल्यामुळे मानव आणि प्राणी यांच्यातील जैवसाखळी बिघडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.
मागील पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत अथवा जखमी झालेल्या मानव आणि पाळीव जनावरांवरील नुकसानभरपाईपोटी वन विभागाला कोट्यवधी रुपये मोजावे लागले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात पाच वर्षांत सुमारे पाच कोटींची भरपाई द्यावी लागली आहे. यावरून इतर जिल्ह्यांची परिस्थितीही लक्षात येते. नुकसानभरपाईपोटी वन विभागाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचेदेखील दुखणे आहेच. त्यामुळे कधी नव्हे ते वन विभागाला बिबट्याची चिंंता सतावू लागली आहे.
उसाच्या शेतातील बिबट्यांचे वास्तव्य कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अंदाज प्रधान मुख्य वनसंरक्षक घेत आहेत. त्यांनी आपल्या विभागाला आदेशित करून सर्व संवर्गातील अधिकारी आणि शेतकऱ्यांकडून याबाबतचा अभिप्राय मागविला आहे. यामध्ये उसाच्या शेतीच्या संरक्षणापासून ते शेतमजूर आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण कसे करता येऊ शकेल याबाबतचा तोडगाही त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, तसेच नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्रही मोठे असल्याने नाशिकमधून या उपाययोजनेची सुरुवात करण्याचा विचार वन विभाग करीत आहे. नाशिक वन परिक्षेत्राचा विचार केला तर संगमनेर, नगर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि मालेगाव असा बिबट्यांच्या संख्येनुसार क्रमांक लागतो. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळून आल्याने त्यांच्या वास्तव्यावर कसे निर्बंध आणता येतील, याचा विचार केला जात आहे.
विशेष म्हणजे, उसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य करणार नाही यासाठी शेतकऱ्यांकडे काही उपाययोजना आहेत का यासाठी काही शेतकऱ्यांनादेखील अभिप्राय कळविण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील कामाला सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्षात ठोस कोणतेही मुद्दे पुढे आलेले नाहीत. वन कर्मचारीच बिबट्याचा संचार रोखण्याबाबत साशंक आहेत; परंतु साहेबांचा आदेश म्हटल्यावर अभिप्रायाचे कागदे रंगविले जातील इतकेच. यातून बिबट्याच्या वास्तव्याचा गांभीर्याने विचार व्हावा असे अपेक्षित असावे; परंतु समोर आलेल्या काही सूचनांवरून मनोरंजनच होऊ पाहात आहे.

Web Title: Dump Panic in the Suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.