डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न येणार ऐरणीवर; उसाटने येथील कचरा प्रक्रिया केंद्राला स्थानिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 06:43 PM2021-06-26T18:43:29+5:302021-06-26T18:44:42+5:30
शासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दिलेल्या भूखंडाची मोजणी करायला गेलेले भूमापन अधिकारी, महापालिका अभियंता, पोलीस यांना स्थानिकांनी विरोध केला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दिलेल्या भूखंडाची मोजणी करायला गेलेले भूमापन अधिकारी, महापालिका अभियंता, पोलीस यांना स्थानिकांनी विरोध केल्याने, त्यांना खाली हात परत यावे लागले. याप्रकारने शहरातील डम्पिंगच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार असून याप्रकरणी शासनाने वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उल्हासनगरात डम्पिंगच्या प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका आयुक्त तसेच सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन शासनाकडे शहराच्या परिसरात भूखंडाच्या मागणी केली. शासनाने महापालिकेच्या मागणीची दखल घेऊन एमएमआरडीएची उसाटने गाव हद्दीतील असलेली ३० एकरची जागा महापालिकेला ४ वर्षांपूर्वी हस्तांतर केली. सदर जागे भोवती सरंक्षण भिंत बांधण्यासाठी ५ कोटींची निविदा काढण्यात आली. डम्पिंगच्या प्रश्न सुटेल असे वाटत असताना भूखंडाच्या सरंक्षण भिंत व कचऱ्यावर प्रक्रिया करण्याला स्थानिकांनी विरोध सुरू केल्यावर, महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प रखडल्याचे बोलले जाते. शुक्रवारी महापालिकरचे अभियंता अश्विनी आहुजा यांच्या सोबत अंबरनाथचे भूमापन अधिकारी, हिललाईन पोलीस जागेची मोजणी करण्यासाठी गेले होते. मात्र स्थानिकांनी जागा मोजणीला विरोध करून आदी ग्रामस्थ, महापालिका अधिकारी, राजकीय नेत्यांची बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली.
भूखंड मोजणीला विरोध झाल्यावर महापालिकेचे अभियंता अश्विनी आहुजा, अंबरनाथचे भूमापन अधिकारी, पोलीस खाली हात परत आले. याप्रकाराने शहरातील डम्पिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली. महापालिकेचे म्हारळ गावा शेजारील राणा डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्यावर, नागरिकांच्या सुरक्षेसाठी डम्पिंग ग्राऊंड कॅम्प नं-५ येथील खडी मशीन येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले. मात्र येथील डम्पिंगही ओव्हरफ्लॉच्या मार्गावर असून शहरातील कचरा कुठे टाकणार? असा प्रश्न उभा ठाकला. दरम्यान उसाटने येथील कचऱ्यावरील प्रकल्प गेल्या ४ वर्षा पासून कार्यान्वित न झाल्याने, महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेतेही याबाबत मुंग गिळून असल्याने, त्यांच्या भूमिकेवरही शहरातून टीका होत आहे.
डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर
कॅम्प नं-५ खडी मशीन येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड निर्माण झाला असून डम्पिंग ओव्हरफ्लॉच्या मार्गावर आहे. तसेच स्थानिक नागरिकांचा डम्पिंगला विरोध कायम आहे. उसाटने येथील कचऱ्यावरील प्रक्रिया केंद्र काही महिन्यात सुरू झाली नाहीतर, शहरातील कचऱ्याचा प्रश्न उभा ठाकणार असून उसाटने येथील जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावावा लागणार आहे.