‘मृत्यूंजय’ चिमुरडी आज घरी जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 03:36 AM2017-05-12T03:36:35+5:302017-05-12T03:36:35+5:30
बारा तासांची हृदयशस्त्रक्रिया आणि त्यानंतर हृदयविकाराचे सहा झटके आल्यानंतरही एका चार महिन्यांच्या लहानगीला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारा तासांची हृदयशस्त्रक्रिया आणि त्यानंतर हृदयविकाराचे सहा झटके आल्यानंतरही एका चार महिन्यांच्या लहानगीला ‘पुनर्जन्म’ देण्यात परळच्या वाडिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे. आता ती पूर्णपणे बरी झाली असून शुक्रवारी सकाळी तिची तपासणी करून तिला घरी सोडण्यात येईल, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विदिशा असे या मुलीचे नाव असून ती कल्याण येथील विशाखा आणि विनोद वाघमारे या गरीब दाम्पत्याची मुलगी आहे. चार महिन्यांपूर्वी विदिशाचा जन्म याच इस्पितळात झाला होता व गेले दोन महिने तिच्यावर शर्थीने उपचार केले गेले. १४ मार्चला तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. कल्याण येथील गरीब कुटुंबातील विदिशाला जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांतच हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. तिच्या रक्तवाहिनीच्या संक्रमणात अडथळा निर्माण झाला. यामुळे तिच्या शरीरात ६० टक्के आॅक्सिजनची कमतरता भासू लागल्याने तिचे शरीर निळे होत गेल्याचे वाडिया रुग्णालयातील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले.
तसेच, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उपचारांना दिरंगाई झाल्याने फुप्फुसांच्या कार्यातही दोष निर्माण झाला होता. डॉ. पांडा यांनी सांगितले की, तिच्या हृदयावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेला तब्बल १२ तास लागले. त्यानंतर आॅक्सिजनची पातळी नियंत्रित आणण्यासाठी तिला ‘हाय फ्रिक्वेन्सी आॅसिल्लोट्री’ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या फुप्फुसाचा त्रास कमी झाल्यानंतर हे व्हेंटिलेटर काढण्यात आले.
शस्त्रक्रियेपूर्वी अतिदक्षता विभागात दाखल असताना एक महिना विदिशाची प्रकृती अस्थिर आणि नाजूक होती. त्या वेळी तिला सहा हृदयविकाराचे झटके आले, मात्र तिच्या जगण्याच्या जिद्दीमुळे ती यशस्वीपणे त्या परिस्थितीतून बाहेर पडली, असे डॉ. पांडा यांनी सांगितले. विदिशाच्या प्रकरणात उपचार आणि वेळेचे समीकरण साधणे अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे. विदिशा ५० दिवस अतिदक्षता विभागात होती. त्यातील तब्बल ४० दिवस तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
हृदयाचे कार्य पूर्ववत केले
‘ट्रान्सपोझिशन आॅफ द ग्रेट आर्टरिज’ हा आजार लहानग्यांमध्ये जन्मत: दिसून येतो. या आजारात हृदयाचे कार्य पूर्णपणे उलटे सुरू असते. या आजाराचे निदान उशिरा झाले की, त्याचा परिणाम इतर अवयवांवर होतो. विदिशाच्या प्रकरणात दीड महिन्यानंतर आजाराबद्दल कळल्यावर १५ दिवस तिची प्रकृती स्थिर करण्यास लागले. तिच्या हृदयास डाव्या बाजूला असणाऱ्या धमन्या उलट्या बाजूला जोडलेल्या होत्या, त्या पूर्ववत केल्या. १४ मार्चला सकाळी ९ च्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू केली होती आणि रात्री ९-९.३० च्या दरम्यान संपली. - डॉ. बिस्वा पांडा, बालहृदयरोगतज्ज्ञ
१५ मिनिटांनी हृदय धडधडले-
विदिशाला हृदयविकाराचा झटका आला त्या वेळी आमच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या वेळेस तब्बल १५ मिनिटे हृदयाचे कार्य सुरू करण्यासाठी डॉक्टरांचा संघर्ष सुुरू होता आणि अखेरीस तब्बल १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर तिचे हृदय धडधडण्यास सुरुवात झाली, असे डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले.
दानशूरांनी केला खर्च-
विदिशावरील उपचारांचा एकूण खर्च पाच लाख रुपयांच्या घरात होता. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आम्ही मित्र- परिवाराकडून जेमतेम ५० हजार रुपयांची कशीबशी जमवाजमव करू शकलो. पण इस्पितळ प्रशासनाने पुढाकार घेतला आणि दानशूर दात्यांनी बाकीच्या पैशाची व्यवस्था केली. या सर्वांच्या पुण्याईमुळे विदिशा पूर्ण बरी होऊ शकली.
- विनोद वाघमारे, विदिशाचे वडील