दापोलीच्या ‘मृणाल’ने केली लाखो मधमाशांशी गट्टी
By admin | Published: October 2, 2014 10:34 PM2014-10-02T22:34:50+5:302014-10-02T22:42:40+5:30
मधमाशा माणसासाठी हानिकारक नाहीत-चावत नाहीत,अंधश्रद्धेतून त्यांना जाळून टाकतो
शिवाजी गोरे - दापोली--मधमाशी हा पर्यावरणातील परागकणांची देवाणघेवाण करणारा महत्त्वाचा घटक आहे. परंतु वाढत्या जंगलतोडीमुळे कधीकाळी जंगलातील झाडावर दिसणारे मधाचे पोळे आता शहरातील काँक्रीटच्या इमारतीवर दिसू लागले आहे. मात्र, गैरसमजामुळे केमिकलचा वापर करुन तर कधी त्यांना जाळण्यात येऊ लागल्याने त्यांची घटती संख्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली आहे. मृणाल खानविलकर यांनी त्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला असून, गेल्या ७ वर्षात ५० लाख मधमाशांना जीवदान देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
मिलिंद खानविलकर व मृणाल खानविलकर हे सुशिक्षित दाम्पत्य पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेली ७ वर्षे मधमाशी मित्र म्हणून काम करत आहे. मधमाशांच्या पोळ्यावर केमिकलचा स्प्रे मारुन त्यांना हटवले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या घटू लागली आहे तर दुसरीकडे वाढत्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन मधमाशांचे जंगलातील अधिवास नष्ट होऊ लागल्याने एकेकाळी नैसर्गिकरित्या झाडावर पोळ तयार करुन ठराविक कालावधीनंतर दुसरीकडे उडून जाणाऱ्या मधमाशांचे जीवन धोक्यात आले आहे. वस्तीस्थान धोक्यात येऊ लागल्याने मधमाशा आता मिळेल त्या ठिकाणी पोळं तयार करू लागल्या आहेत.जंगलातील मधमाशा शहरातील आता काँक्रीटच्या इमारतीला बसून आपले मधाचे पोळ तयार करु लागल्या आहेत. परंतु इमारतीला मधमाशांचे पोळ अशुभ मानले जाऊ लागल्याने इमारतीतील लोक मधमाशी घालवण्यासाठी त्यांच्यावर केमिकलचा स्प्रे मारुन, तर कधी त्यांना जाळून त्यांचे अस्तित्व नष्ट करत आहेत.
निसर्गाच्या चक्रातील महत्त्वाचा घटक नष्ट होऊ नये, यासाठी माशा वाचवण्यासाठी समाजात जनजागृतीचे काम मृणाल खानविलकर यांनी सुरु ठेवले आहे. मधमाशा या शेतकऱ्याच्या मित्र आहेत. त्या वाचल्या पाहिजेत. यासाठी इमारतीवर बसलेले मधाचे पोळे कसल्याही केमिकलचा किंवा जाळाचा वापर न करता त्यांना जीवदान देण्याचे काम त्या करीत आहेत. कुठेही मधमाशीचे पोळ दिसल्यास केवळ एक फोन करा. विनामोबदला इमारतीचे पोळ काढून लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करुन नैसर्गिकरित्या त्यांची सुटका करण्याचे काम त्या करत आहेत.मधमाशांपासून मध मिळते. हा मध बऱ्याच रोगावर औषध म्हणून वापरला जातो. मध हे केवळ मधमाशाच बनवू शकतात. मधाचे फायदे आयुर्वेदात आपण दैनंदिन जीवनात पाहतो. परंतु त्याचप्रमाणे निसर्गात मधमाशांचे महत्वसुद्धा फार मोठे आहे. त्यासाठी मधमाशा वाचवण्याबरोबरच नैसर्गिक मधही मिळणे गरजेचे आहे. मधमाशांच्या पोळापासून मिळणारा मध गरजूंना देऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना चांगला मध देण्याबरोबरच त्यांचा जीव वाचवण्यात त्याना आनंद मिळतो. मधमाशा वाचवण्याची ही मोहीम गेली काही वर्षे राबवत असून या मोहीमेबाबत जागृतीही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मधमाशा माणसासाठी हानिकारक नाहीत. त्या कधी कुणालाही चावत नाहीत. परंतु आपण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा अंधश्रद्धेतून त्यांना जाळून टाकतो. त्यामुळे त्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी मधमाशा जगल्या पाहिजेत.
- मृणाल मिलिंद खानविलकर