रुग्णदुपटीचा कालावधी ५४ वरून ६१ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 07:17 AM2020-09-25T07:17:36+5:302020-09-25T07:17:49+5:30
मुंबईकरांना दिलासा; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ठरते आहे प्रभावी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांवरून ५४ दिवसांवर आला होता. मात्र १५ सप्टेंबरपासून राज्यस्तरावर सुरू झालेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबईत प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे. घरोघरी जाऊन तापमान व प्राणवायूची तपासणी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध आणि अन्य प्रभावी उपाययोजनांमुळे आता ६१ दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.
आॅगस्ट महिन्यापर्यंत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तसेच गणेशोत्सव काळात नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणी वावर वाढला. परिणामी, १ सप्टेंबरपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी दिवसेंदिवस कमी होत चालला होता. तसेच दैनंदिन वाढ ०.७५ वरून १.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे, दररोज १५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पालिका कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे सुमारे पाच हजार कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी, त्यांच्यातील प्राणवायूचे प्रमाण तपासणे, सर्वेक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक कार्यवाही करीत आहेत. या मोहिमेत बाधितांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाणही वाढविल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.
असा होईल मोहिमेचा फायदा
प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधताना मिळालेली माहिती राज्य सरकारद्वारे या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या अॅण्ड्रॉईड आधारित मोबाइल अॅपमध्ये जतन केली जाईल. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या सर्व माहितीचे जलद गतीने विश्लेषण करणे शक्य होईल. परिणामी, कोविड नियंत्रण विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य होईल.
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध : मोहिमेअंतर्गत बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण
१० हजारांवरून २० हजारांपर्यंत आले. सर्व उपाययोजनांनंतर १५ सप्टेंबरला ५४ दिवसांवर असलेल्या रुग्णदुपटीचा काळ बुधवारी ६१ दिवसांवर आला.