अमित शाहंच्या दौऱ्यादरम्यान लुडबुड पडली महागात; धुळे जिल्ह्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 09:40 AM2022-09-09T09:40:25+5:302022-09-09T09:43:23+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले असताना कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ पास असलेल्या व्हीआयपी लोकांना कार्यक्रमाला प्रवेश दिला जात होता.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांच्या ताफ्यात ताेतया अधिकारी म्हणून वावरणाऱ्या धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील हेमंत पवार याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पवार हा स्वत:ला आंध्र प्रदेशातील खासदाराचा स्वीय सहायक म्हणून त्याठिकाणी वावरत होता. त्याच्या ओळखपत्रावरून सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले असताना कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ पास असलेल्या व्हीआयपी लोकांना कार्यक्रमाला प्रवेश दिला जात होता. मात्र, हेमंत पवार हा तेथे पांढरा शर्ट आणि निळा कोट परिधान करून अधिकारी म्हणून वावरत होता. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवती पवार वारंवार दिसत होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर तब्बल तीन तास हेमंत पवार घुटमळत होता. शिवाय गणेश दर्शनासाठी अमित शाह गेल्यावर तेथेही पवार हा जवळपास वावरत होता. त्यामुळे अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी तैनात अधिकाऱ्यांना पवार याचा संशय आला.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव हेमंत पवार सांगितले. तसेच आपण आंध्र प्रदेशच्या खासदारांचा स्वीय सहायक असल्याची माहिती दिली. मात्र, त्याच्याजवळ असलेले ओळखपत्र हे केंद्रीय गृह विभागाचे होते. त्यामुळे अधिक संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो तोतया अधिकारी म्हणून वावरत असल्याचे उघडकीस आले. यावरून मुंबई पोलिसांनी पवार याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात भादंवि कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
कोण आहे हा पवार?
- पवार हा उच्चशिक्षित आहे. त्याचे वडील पोस्टमन आहेत. हेमंत पवार याचे इंग्रजीसह विविध भाषांवर प्रभुत्व आहे. तो गेल्या काही वर्षापासून दिल्ली, मुंबई, हैद्राबाद अशा शहरात राहतो.
- कधीतरी गावी येतो. तो गावात आपले दिल्ली, मुंबईतील मोठ्या नेत्याशी संपर्क असल्याचे सांगत असल्याचेही समोर आले आहे.
- त्याने आतापर्यंत कुठे किती वेळा अशाप्रकारे ओळखपत्राचा वापर केला याबाबत अधिक तपास सुरू आहे.