भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, राजेंद्र गवई यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 06:39 PM2018-01-16T18:39:09+5:302018-01-16T22:04:48+5:30
भाजप सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली.
अमरावती - कोरेगाव भीमा प्रकरण हे मराठा समाजाने पेटविले, असे मनुवादी प्रवृत्तीकडून जाणीवपूर्वकरीत्या पेरले जात आहे. मात्र, मराठा-बौद्ध असा हा वाद नाहीच. मराठा समाज गुन्हेगार असल्याचा एकही पुरावा नाही. मराठा विरुद्ध बौद्ध असा संघर्ष रंगविण्याचे षड्यंत्र या घटनेआडून सुरू असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली.
भाजप सरकारच्या काळात राज्यातील आंबेडकर अनुयायांवरील अत्याचारांमध्ये दखलनीय वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे, असे विधान त्यांनी केले. दंगलीमागे कुणाचा हात आहे, हे पोलिसांनी शोधून काढावे. संभाजी (मनोहर) भिडे, मिलिंद एकबोटे हे या घटनेमागे असल्याचा प्रकाश आंबेडकरांनी जो आरोप केला तो सत्य आहे, असा दुजोराही गवई यांनी दिला.
कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर भारीप-बहुजप महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात झालेल्या वाक्युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गवई यांनी रिपाइंची भूमिका मांडली. गवई यांच्या मते, आठवले आणि आंबेडकर हे दिग्गज नेते आहेत, यात दुमत नाही. मात्र, रिपाइं ऐक्यासाठी दोघांनीही पुढाकार घेतला तर ते स्वागतार्ह असेल. सूत्र कोणतेही असावे; पण रिपाइंचे ऐक्य ही काळाची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांशिवाय ते ऐक्य नसेल, असेही गवई म्हणाले.
कोरेगाव भीमाप्रकरणी राज्यभर बंद पुकारला. त्यानंतर काही ठिकाणी जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना घडल्यात. हे कृत्य समाजकंटकांनी केले. यात रिपाइं कार्यकर्ता नव्हता, असे गवई यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी निरपराधांवर गुन्हे दाखल करून अन्यायकारक अटकसत्र चालविले आहे. अमरावतीत काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी आपण संबंधित व्यावसायिकांना भेटणार आहोत. रिपाइं हा समता प्रस्थापित करणारा पक्ष असून सलोख्यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाऊसाहेब ढंगारे, वसंतराव गवई, हिमंत ढोले, दीपक सरदार, उमेश इंगळे आदी उपस्थित होते.
रिपाइंची काँग्रेससोबत मैत्री
रिपाइं (गवई गट) हा काँग्रेससोबत राहील. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष विचारसरणीची सोबत करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढणार असल्याचे राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.