इंग्रजांच्या काळात विठ्ठलाची पूजा कोण करायचे? जाणून घ्या वारीचा महिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 02:55 AM2019-07-12T02:55:57+5:302019-07-12T05:24:46+5:30
शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली.
पंढरपूर : चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विठेवरी... आज आषाढी एकादशी. शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. यामध्ये लातूरच्या शेतकरी दांपत्याला महापूजेचा मान मिळाला. पण ही शासकीय पूजा इंग्रजांच्या काळातही सुरू होती. मात्र, त्या काळात ही पूजा कोण करायचे? इंग्रज करायचे का? चला जाणून घेऊया या विठ्ठल पूजेचा महिमा.
भारतावर साधारण दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य होते. या काळातही पंढरपूरची वारी विनाखंड सुरूच होती. आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय पूजा खूप वर्षांपासून केली जाते. इंग्रजांच्या काळातही ही केली जात होती. मात्र, इंग्रज हिंदू नसल्याने ते ही पूजा करत नव्हते. तर त्यांनी नेमलेले प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी (कलेक्टर) किंवा त्यापेक्षा मोठा अधिकारी ही पूजा करत असे. महत्वाचे म्हणजे इंग्रजांनी या पूजेला कधीही विरोध केला नव्हता.
शासकीय पूजा म्हणजे विठ्ठल मंदिराला देणगी ही आलीच. आजही जो मुख्यमंत्री असेल तो सरकारी निधीतून ही देणगी देत असतो. आश्चर्याचे म्हणजे तेव्हा इंग्रजही ही देणगी देत होते. विठ्ठल मंदिरात पूजा केल्याचा मान म्हणून इंग्रज तेव्हा 2000 रुपये देत होते. ही सर्व माहिती मंदिराच्या विश्वस्तानी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पूजा कधी करायची याची सुरुवात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली. आषाढीची पूजा मुख्यमंत्री आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री करण्याचे ठरविण्यात आले. कारण या पुजेला दोन ते अडीज तास लागयचे. एवढा वेळ का लागतो आणि दोघे दोघे पुजाला कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत हा निर्णय घेतला.