बंद काळात परराज्यातील निकृष्ट भाजी मुंबईकरांच्या माथी

By admin | Published: June 9, 2017 05:01 AM2017-06-09T05:01:09+5:302017-06-09T05:01:09+5:30

शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला

During the closing period, the downside of the state, Mumbai Bharati | बंद काळात परराज्यातील निकृष्ट भाजी मुंबईकरांच्या माथी

बंद काळात परराज्यातील निकृष्ट भाजी मुंबईकरांच्या माथी

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शेतकरी संपाच्या काळात मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने परराज्यातील निकृष्ट दर्जाचा मालही मुंबईकरांच्या माथी मारण्यात आला. टोमॅटो, फ्लॉवर व इतर सडक्या भाज्याही जादा दराने विकण्यात आल्या. दोन दिवसांपासून आवक प्रचंड वाढल्याने बाजारभाव गडगडले असून, खराब झालेल्या टोमॅटो व इतर भाज्यांचे ढिगारे बाजार समितीमध्ये पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
हमीभावासह प्रलंबित मागण्यांसाठी १ जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा २ जूनपासून मुंबईकरांना फटका बसला. राज्यातून कृषी माल विक्रीसाठी येणार नसल्याने व्यापाऱ्यांनी गुजरात, कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेशामधून जो माल उपलब्ध होईल तो विक्रीसाठी मागविला होता. कर्नाटक व गुजरातमधून सर्वात जास्त आवक होऊ लागली होती. मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारभाव प्रचंड वाढले. याचा गैरफायदा घेऊन परराज्यातील व्यापाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचा मालही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला.
विशेषत: कर्नाटकमधून सडलेले टोमॅटो विक्रीला आले. कर्नाटकमधून मुंबईमध्ये माल घेऊन येणाऱ्या ट्रकला २४ तासांचा प्रवास करावा लागतो. त्यापूर्वी एक दिवस अगोदर शेतामधून माल काढण्यात येतो. पॅक केलेला हलक्या दर्जाचा माल येथे येईपर्यंत पूर्ण खराब होऊ लागला होता. चांगल्या मालाच्या क्रेटमध्ये खराब माल ठेवण्यात आल्याने किरकोळ विक्रेत्यांनी तो खरेदी करून ग्राहकांना विकला. कमी प्रतीचा टोमॅटो किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपये किलोने विकला गेला.
बंद काळात मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. दोन दिवसांपासून पुणे, नाशिक, सातारा परिसरातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. पुणे व सोलापूरमधील चांगल्या दर्जाचा टोमॅटो विक्रीसाठी येत असून त्याला भाव मिळत नव्हता.
>राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान
७ जूनपासून मुंबईमध्ये पुणे, नाशिक व राज्याच्या इतर भागातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. परंतु आवक वाढल्याने आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेनासा झाला असून त्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. कमी दराने माल विकावा लागत असून विक्री न झालेला व खराब झालेला माल फेकावा लागत आहे.
संप सुरू झाल्यापासूनची आवक
दिनांकआवक टोमॅटो फ्लॉवर
२ जून५७१४२६
३ जून१०९९६७७७
५ जून१७१५३३०१५१
६ जून१३५९१९२११८
७ जून२२४०५६९३५४
८ जून१९८७४१५२८५
>गुरुवारची राज्यनिहाय आवक
राज्यआवक (ट्रक)
महाराष्ट्र४२३
कर्नाटक१३
गुजरात३१
दिल्ली१७
मध्य प्रदेश१२
उत्तर प्रदेश१४
तामिळनाडू६
आंध्र प्रदेश५
शेतकरी बंदच्या काळात तुटवडा असल्याने परराज्यातून कृषीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत होता. भाव चांगला मिळत असल्याने खराब मालही काही प्रमाणात विक्रीसाठी पाठविण्यात आला. वाहतुकीदरम्यान काही माल खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे.
- शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी,
मुंबई एपीएमसी

Web Title: During the closing period, the downside of the state, Mumbai Bharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.