गणेशोत्सवाच्या काळात भाविकांनो सावधान...

By Admin | Published: September 21, 2015 02:42 AM2015-09-21T02:42:15+5:302015-09-21T14:39:18+5:30

गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुटुंबासह घराबाहेर पडणाऱ्या भक्तांवर नजर ठेऊन असलेले चोऱ्या, लूटमार करणारे गुन्हेगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत

During the Ganeshotsav, devotees are careful ... | गणेशोत्सवाच्या काळात भाविकांनो सावधान...

गणेशोत्सवाच्या काळात भाविकांनो सावधान...

googlenewsNext

मनीषा म्हात्रे, मुंबई
गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुटुंबासह घराबाहेर पडणाऱ्या भक्तांवर नजर ठेऊन असलेले चोऱ्या, लूटमार करणारे गुन्हेगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. गेल्यावर्षी महिनाभराच्या कालावधीत शहरात सरासरी ५०० चोऱ्या, २५० घरफोड्या आणि १०० सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात होत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडील आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देत गणेशभक्तांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवाची चाहूल लागताच मुंबईत नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांची पावले आपोआप गावाच्या दिशेने वळतात. संपूर्ण कुटुंब दीड दिवस, पाच दिवस तर काही कुटुंबे अनंत चतुर्थीपर्यंत बाप्पाच्या सेवेसाठी घराला टाळे ठोकून गावी रवाना होतात. ही संधी साधून मराठी कुटुंबे राहत असलेल्या भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, दादर, चिंचपोकळी, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरातील बंद घरांमध्ये लुटारू हात साफ करताना दिसत आहेत. बाप्पांच्या आगमनापूर्वी १३ सप्टेंबरपर्यंत ११५ घरफोड्या झाल्या असून, त्यापैकी अवघ्या १८ घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी, चेंबूर, अंधेरी, फोर्ट आणि विलेपार्लेसारख्या ठिकाणी बाप्पांची दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळते. याच गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी, चोरी तसेच महिलांच्या छेडछाडीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. आतापर्यंत ३०८ चोरी, ३८ सोनसाखळी आणि ८७ विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात २५५ मुंबईकरांचे घर लुटले गेले. पैकी ४२ गुन्ह्यांची उकल झाली, तर ५३५ चोरी, आणि १०३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. १६७ महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. याला आवर घालण्यासाठी पोलिसांनी पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. ठिकठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे, तरीही पोलिसांची नजर चुकवून गर्दी, बंद घरांचा गैरफायदा घेत भाविकांची लूट सुरूच आहे. त्यामुळे भाविकांनीही गर्दीत सतर्क राहण्याची गरज आहे. गर्दीत दागिने घालू नयेत. तसेच गावी असल्यास शेजारी अथवा जवळच्या नातेवाइकांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे, असे आवाहन मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

Web Title: During the Ganeshotsav, devotees are careful ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.