कमी गर्दीच्या वेळी तुळजाभवनीच्या दर्शनासाठी महाद्वारातून प्रवेश
By admin | Published: September 15, 2016 04:04 AM2016-09-15T04:04:30+5:302016-09-15T04:04:30+5:30
श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सव कालावधीत कमी गर्दीच्या वेळी भाविकांना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सव कालावधीत कमी गर्दीच्या वेळी भाविकांना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार व शहर मंदिर संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत बैठक घेऊन सन्मानजनक तोडगा काढावा, असे आदेशही त्यांनी दिले.
मागील काही दिवसांपासून शहर संघर्ष समिती व जिल्हा प्रशासनात नवरात्रोत्सव कालावधीतील प्रवेश मार्गावरून वाद निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या वादावर पडदा पडला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कागदपत्रांसह शहर संघर्ष समितीची बाजू मुख्यमंत्र्यांपुढे सादर केली. पूर्वी रस्ते अरूंद असतानाही भाविकांना महाद्वारातून प्रवेश दिला जात होता. आता तर शहर विकास प्राधिकरणामुळे हे रस्ते रूंद झाले आहेत. त्यामुळे महाद्वारातून प्रवेशाची शहर संघर्ष समितीची मागणी योग्य असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी देखील परंपरेनुसार महाद्वारातून प्रवेश देणे योग्य राहील, असे मत मांडले. यावर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुरक्षिततेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात येणार होता, असे सांगून स्थानिक पातळीवर चर्चा करून योग्य मार्ग काढू, असे सांगितले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत फडणवीस यांनी सर्वांची मते ऐकून घेऊन शेवटी भाविकांना कमी गर्दीच्या वेळी महाद्वारातून प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)