संमेलनकाळात जमला साडेसात टन कचरा
By admin | Published: February 9, 2017 04:06 AM2017-02-09T04:06:00+5:302017-02-09T04:06:00+5:30
शहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट
अनिकेत घमंडी, डोंबिवली
शहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लावली. त्यात ५.५ टन कचरा, तर २ टन सुका कचरा होता. सध्या मंडप उतरवण्याचे काम सुरू असून आणखी एक टन कचरा निघेल. त्याचीही तातडीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
महापालिकेच्या ‘ई’ प्रभाग स्वच्छता विभागाचे अधिकारी नरेंद्र धोत्रे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी चार ठिकाणी नियोजन केले होते. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कागद, पुठ्ठे, पाण्याचे ग्लास आदी गोळा करण्यात आले. तर, ओल्या कचऱ्यात भोजन, न्याहारी, चहापान आदी ठिकाणी उरलेले अन्न, भाज्यांची टरफले तसेच भोजनमंडप आदी ठिकाणचा कचरा होता. ठिकठिकाणी कचऱ्याच्या पेट्या ठेवल्या होत्या. स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये २४ कामगार नेमले होते. तसेच १२ जानेवारीपासून मैदानाच्या सफाईसाठी १५ कामगार कार्यरत होते. कचरा उचलणे तसेच तो डम्पिंगपर्यंत वाहून नेण्यासाठी एक बुलडोझर, ट्रक, आरसीसी गाड्या तैनात होत्या. प्लास्टिक कचरा तातडीने वेगळा करण्यात आला. त्यामुळे त्याची तातडीने विल्हेवाट लावता आली.
त्याचबरोबर संमेलनस्थळी प्रत्येक सभामंडपात धूरफवारणी, जंतुनाशक पावडरफवारणी तसेच तीन फिरती शौचालये सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथे साहित्यप्रेमींची कुठलीही गैरसोय झाली नाही, असे ते म्हणाले.
साहित्यप्रेमींचेही सहकार्य
साहित्यप्रेमी, नागरिक यांनीही स्वच्छता राखण्यासाठी साहाय्य केले. कुठेही अनावश्यक कचरा टाकला नाही. स्वच्छ भारत अभियान जागृतीचे बॅनर लावल्याने काहीसा फरक पडला.
कचरापेट्यांमध्येच उपस्थितांनी कचरा टाकल्याने सफाई कामगारांनाही त्रास झाला नाही. स्वच्छता ठेवणे सोपे झाल्याचे धोत्रे म्हणाले.