काँग्रेसच्या काळात चेलेचपाटे, चमचे यांची गरिबी हटली; गडकरींचे काँग्रेसला खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:23 IST2024-11-17T13:22:19+5:302024-11-17T13:23:09+5:30
भाजपचे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली.

काँग्रेसच्या काळात चेलेचपाटे, चमचे यांची गरिबी हटली; गडकरींचे काँग्रेसला खडेबोल
सोलापूर : काँग्रेस सरकारच्या काळात गरीब, शेतकऱ्यांची नव्हे तर त्यांचे नेते, कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमचे यांची गरिबी हटली, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.
भाजपचे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या धोरणांमध्ये ग्रामीण विकासाचा समावेश नव्हता. काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे देशाचा सत्यानाश झाला. त्या काळात सरकारने एअर इंडिया, कर्नाटकमध्ये साेन्याची फॅक्टरी टाकली. पण सर्वकाही नुकसानीत गेले. त्या काळात प्रत्येक गावाला रस्ता, सिंचनाची सुविधा, शाळा, दवाखाने असते तर देशातील लोक मागास राहिले नसते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. या योजनेतून साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते तयार केले. काँग्रेसच्या काळात नियोजन चुकले. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला. वीस कलमी, चाळीस कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, त्या स्थितीची आठवण करा.
गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या स्थितीची आज आठवण करा. गावात शाळेची बिल्डिंग होती, पण शिक्षक नव्हते. शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती. दवाखान्यांची अवस्था वाईट होती. काँग्रेसने आपल्या नेत्यांना इंजिनिअरिंग कॉज, मेडिकल, डीएड कॉलेज वाटले.