टंचाईच्या काळात दिलासा देणारा प्रकल्पच फेल
By admin | Published: July 4, 2016 08:07 PM2016-07-04T20:07:43+5:302016-07-04T20:07:43+5:30
पावसाच्या बदलत्या ट्रेण्डमुळे दरवर्षी पाणीप्रश्न भीषण रुप घेऊ लागला आहे़ त्याचवेळी पाणीटंचाईवर तोडगा म्हणून हाती घेतलेला रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मात्र फेल गेला आहे़
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : पावसाच्या बदलत्या ट्रेण्डमुळे दरवर्षी पाणीप्रश्न भीषण रुप घेऊ लागला आहे़ त्याचवेळी पाणीटंचाईवर तोडगा म्हणून हाती घेतलेला रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मात्र फेल गेला आहे़. वारंवार सुचना व कारवाईचा धाक दाखवून मुंबईत हजारो नवीन इमारतींमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत नसल्याचे उजेडात आले आहे़ त्यामुळे छतावरुन हजारो लीटर पावसाचे पाणी वाहून वाया जात आहे़
भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालवत असल्याने पालिकेने ५०० चौ़मी़ जागेतील इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा केला़ इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सूट देण्याची योजना १ एप्रिल २०१० पासून पालिकेने अंमलात आणली़ राज्य सरकारने धोरण व नियमावली तयार न केल्यामुळे या योजनेचे निकष आणि इमारतींवर देखरेखीसाठी यंत्रणा उभी राहू शकली नाही़ तसेच खर्चिक असल्याने अनेक इमारती या प्रकल्पासाठी इच्छुक नाहीत़
मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतींची पुर्नबांधणी होत आहे़ मात्र या इमारतींमध्ये हा प्रकल्प राबविला जात नाही़ पालिकेचे उद्यान, शाळा व रुग्णालयांमध्येही हा प्रकल्प उभारण्याबाबत प्रशासनच उदासिन असल्याचेही दिसून आले आहे़ त्यामुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये हजारो इमारतींची भर पडली़ तरी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प १० टक्के इमारतींमध्येही नसल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे़