वर्षभरात २ लाख वेळा खणखणला १०८
By admin | Published: January 5, 2015 05:06 AM2015-01-05T05:06:22+5:302015-01-05T05:06:22+5:30
शहर, अपघातग्रस्तांना गोल्डन अवर (एका तासाच्या आत) उपचार मिळणे गरजेचे असते. पण, रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कुठे कॉल करायचा हे अनेकदा माहीत नसते
पूजा दामले, मुंबई
शहर, अपघातग्रस्तांना गोल्डन अवर (एका तासाच्या आत) उपचार मिळणे गरजेचे असते. पण, रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कुठे कॉल करायचा हे अनेकदा माहीत नसते, रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचत नाही, अशामुळे अनेकदा अपघातग्रस्तांची प्रकृती गंभीर होते. हे टाळण्यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्र आणीबाणी वैद्यकीय सेवा (एमईएमएस) अर्थातच १०८ क्रमांक रुग्णवाहिकेसाठी सुरू करण्यात आला. वर्षभरात १०८ क्रमांकावर राज्यभरातून एकूण २ लाख ७ हजार २३ कॉल्स आल्याची माहिती एमईएमएसचे मुख्य संचालक अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
अपघातग्रस्तांना एका तासाच्या आत योग्य ते उपचार मिळाल्यास त्यांच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा होऊ शकते. पण, वर्षभरापूर्वीपर्यंत रुग्णवाहिकेसाठी कोणताही एकच क्रमांक नसल्यामुळे अनेकदा अपघात स्थळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसे. पण, १०८ या क्रमांकावर कॉल गेल्यास १० ते ३० मिनिटांच्या कालावधीत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. यामुळे अनेक अपघातग्रस्तांना याचा फायदा झाला आहे. २ लाख ७ हजार २३ कॉल्सपैकी १४ हजार ९७८ कॉल्स हे मुंबईतून आलेले आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली.
वैद्यकीय गरज असताना सर्वाधिक म्हणजे एकूण १० हजार २६ कॉल्स मुंबईतून आले आहेत. तर त्याच्या खालोखाल १ हजार ८४९ कॉल्स हे गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी आले आहेत. ही सेवा फक्त अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. परंतु, तरीही प्रसूतीसाठी महिलांना रुग्णालयात नेण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर या क्रमांकाचा वापर केला जातो. (प्रतिनिधी)